पिंपरीतील नवीन प्रशासकीय इमारत आणि डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडून पाहणी
पिंपरीतील नवीन प्रशासकीय इमारत आणि डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्याकडून पाहणी
पावसाळ्यापूर्वी सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून दर १५ दिवसाला प्रकल्प अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारत तसेच डेअरी फार्म उड्डाणपूल प्रकल्पाअंतर्गत येणारी पावसाळ्यापूर्वीची सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. विशेषतः प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी निचरा व्यवस्था आदी कामे पुर्ण करण्यावर भर द्यावा. याशिवाय, प्रकल्पाच्या कामांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्यात यावा. तसेच आवश्यक अंदाजपत्रकीय तरतुदींसाठी सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची तत्काळ पूर्तता करून प्रकल्पांच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी आज पिंपरी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची तसेच डेअरी फार्म परिसरात सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
या पाहणीदरम्यान मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता विजय भोजने, संध्या वाघ तसेच उपअभियंते, कनिष्ठ अभियंते आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम म्हणाले, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा तसेच डेअरी फार्म उड्डाणपूल प्रकल्पासंबंधित सर्व विभागांनी कामांमध्ये अधिक समन्वय ठेवून प्रकल्पांची गती वाढविणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वीची सर्व महत्त्वाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत. विशेषतः प्रकल्प परिसरातील रस्त्यांचे डांबरीकरण, पाणी निचरा व्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामे वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नवीन प्रशासकीय इमारत हा महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि भविष्यातील प्रशासन अधिक सक्षम करणारा प्रकल्प आहे. या इमारतीमुळे महापालिकेची विविध कार्यालये एकाच छताखाली येणार असून नागरिकांना अधिक वेगवान, सुलभ आणि सर्वसमावेशक आधुनिक सेवा उपलब्ध होतील. त्यामुळे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत. तसेच डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होईल. त्यामुळे या प्रकल्पातील उर्वरित कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे.
याशिवाय, दोन्ही प्रकल्पाच्या कामांचा प्रगती अहवाल दर १५ दिवसांनी सादर करण्यात यावा. आवश्यक अंदाजपत्रकीय तरतुदींसाठी सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींची तत्काळ पूर्तता करून उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी दिले.
यावेळी मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर तसेच कार्यकारी अभियंता विजय भोजने, संध्या वाघ यांनी प्रकल्पांची सद्यस्थिती, आवश्यक तांत्रिक बाबी, प्रकल्पांची वैशिष्ट्ये, आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांचा प्रगती आढावा तसेच आगामी नियोजनाबाबतची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना सादर केली.