पिंपरी | १६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरीतील बौद्धनगर परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून किराणा दुकानदार आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. दगड, गट्टू आणि कोयत्याने मारहाण करून दुकानातील साहित्याची तोडफोड केल्याप्रकरणी नऊ आरोपी आणि दोन विधिसंघर्षित बालकांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास गिरजुबाबा मंदिराशेजारील फिर्यादीच्या किराणा दुकानासमोर आणि त्यांच्या घरी घडली. या प्रकरणी ३५ वर्षीय किराणा दुकानदार महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी, त्यांचे पती भगवान माने आणि मुलगी दुकानासमोर बसले असताना आरोपींनी जुन्या वादातून हल्ला केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत दगड, गट्टू आणि कोयत्याने मारहाण केल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींपैकी एकाने फेकलेला दगड फिर्यादीच्या मुलीच्या डोक्याला लागल्याने ती गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तसेच आरोपींनी दुकानातील सामानाची तोडफोड करून नुकसान केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, हल्ल्यादरम्यान आरोपींनी कुटुंबीयांना धमकावले. त्यानंतर आरोपींनी दुकानाच्या काउंटरवर कोयता मारून नुकसान केले. पुढे फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय घरात गेल्यानंतरही आरोपींनी घरात घुसून सामानाची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणात सिद्धार्थ ऊर्फ चिमुकल्या गालफाडे (वय २०), दीपक ऊर्फ दिप्या केशव लोखंडे (वय १८), सुखदेव जेट्टीथोर (वय २१), प्रतीक अंकुटे (वय १९), प्रथमेश विष्णू हजारे (वय १८), विशाल गालफाडे (वय २२), अभिषेक व्यंकट कांबळे (वय १९), गुड्ड्या गालफाडे (वय २१) आणि पवन राहुल आचार्य (वय १८) यांच्यासह दोन विधिसंघर्षित बालकांचा समावेश आहे. तर आरोपी क्र.२,५,७,९ यांना अटक करण्यात आली आहे.
पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता आणि संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.