पिंपरी | १६ ऑक्टोबर २०२६ : पिंपरीतील बौद्धनगर परिसरात जुन्या भांडणाच्या रागातून दोन गटांत हिंसक हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. गिरजुबाबा मंदिर परिसरात घडलेल्या या प्रकारात कोयता, पालघन, बांबू आणि दगडांचा वापर करून मारहाण केल्याच्या परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास गिरजुबाबा मंदिराशेजारील किराणा दुकानासमोर आणि फिर्यादीच्या घरी घडली. या प्रकरणी ३५ वर्षीय महिला किराणा दुकानदाराने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी, त्यांचे पती भगवान माने आणि मुलगी दुकानासमोर बसले असताना जुन्या भांडणाच्या रागातून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपींनी दगड, गट्टू आणि कोयत्याने मारहाण केली. या हल्ल्यात फेकलेला दगड मुलीच्या डोक्याला लागून ती गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड करून कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सिद्धार्थ ऊर्फ चिमुकल्या गालफाडे, दीपक केशव लोखंडे, सुखदेव जेटीथोर, प्रतीक अंकुटे , प्रथमेश विष्णू हजारे , विशाल गालफाडे, अभिषेक व्यंकट कांबळे, गुड्ड्या गालफाडे आणि पवन राहुल आचार्य यांच्यासह दोन विधिसंघर्षित बालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच परिसरातील दुसऱ्या घटनेबाबत यश बाळासाहेब गायकवाड यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दांडिया पाहण्यासाठी गेले असताना जुन्या वादातून पाच जणांनी हल्ला केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
फिर्यादीनुसार, भगवान नरहरी माने (वय ४८) यांनी कोयत्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. हा वार अडवताना यश यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली.
तसेच साहील माने यांनी पालघनने खांद्यावर वार केल्याने मनगटाला आणि पाठीला दुखापत झाली. निखिल माने यांनी बांबूने मारहाण केली, तर शीतल माने यांनी दगडाने छातीवर मारल्याचा आरोप आहे. विकास माने यांनी मारहाण करून इतरांना चिथावणी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या हल्ल्यामुळे दांडिया पाहण्यासाठी जमलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या दोन्ही तक्रारींवरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १५५/२०२६ आणि १५६/२०२६ असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या गुन्ह्यात खुनाच्या प्रयत्नासह संबंधित कलमांचा समावेश असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे
दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले असून, घटनांचा नेमका क्रम आणि हल्ल्याची परिस्थिती पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. एका गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजपूत, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करत आहेत.