स्थायी समितीने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय समिती स्थापन
पिंपरी, ता. १० - महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सर्व प्रशासकीय नियम धाब्यावर बसवून ५२ कोटींहून अधिक रकमेची बिले ठेकेदारांना परस्पर अदा केली असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या घोटाळ्याची सखोल चौकशी करावी आणि प्रवीण जैन यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी बारणे यांनी केली आहे. त्यानुसार, प्रशासनाने पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. सात दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याच्या सूचना या समितीला दिल्या आहेत.
अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही पाच सदस्यीय समिती चौकशी करणार आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे व तृप्ती सांडभोर, मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर आणि मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांचा या समितीमध्ये समावेश आहे. स्थायी समितीने केलेल्या आरोपांची ही समिती सखोल चौकशी करणार आहे.
त्यासाठी समितीला संबंधित सर्व फाइल्स, बिलांच्या प्रती, प्रशासकीय मंजुरी, बजेट कोड, ठेकेदारांची नावे आणि अंतिम देयकांची तपशीलवार पडताळणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.