बकरी ईदनिमित्त शहरात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी नागरीकांना चोख सुविधा पुरवाव्यात, आयुक्तांची प्रशासनाला सूचना

बकरी ईदनिमित्त शहरात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी नागरीकांना चोख सुविधा पुरवाव्यात, आयुक्तांची प्रशासनाला सूचना

बकरी ईदनिमित्त शहरात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी नागरीकांना चोख सुविधा पुरवाव्यात, आयुक्तांची प्रशासनाला सूचना 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक 

पिंपरी, ता. २१ -  बकरी ईदनिमित्त २८ मे रोजी शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्या अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. तसेच या सणाचे महत्त्व लक्षात घेता नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करुन नियमांचे पालन करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापालिका प्रशासन, पोलीस विभाग तसेच शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. 

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उप आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, सुनीलदत्त नरोटे, विजयसिंह भोसले, महेश कावळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम यांच्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रविण मोरे, पोलीस निरीक्षक भोजराज मिसाळ, महेंद्र कदम तसेच कुरेशी जमात व्यापारी संघटनेचे युसूफ कुरेशी, गफूर कुरेशी, जमील कुरेशी, शकिल कुरेशी, मौलाना तनवीर, मौलाना फल्जेहक, सबिर कुरेशी, करीम कुरेशी, अकबर कुरेशी, तायपाज कुरेशी, ईर्शाद कुरेशी, शफिक काझी, ऐफाज कुरेशी आदी उपस्थित होते. 

महापालिकेच्या वतीने कुर्बानीसाठी निश्चित करण्यात आलेल्या तात्पुरत्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामध्ये पत्राशेड, मंडप, पुरेसा पाणीपुरवठा, मोबाईल टॉयलेट व्हॅन, स्वच्छतेसाठी आवश्यक मनुष्यबळ तसेच वेस्ट संकलनासाठी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

कुर्बानीसाठी आणण्यात येणाऱ्या जनावरांच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र जागा, पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच अतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी टँकर आणि हौदांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कुर्बानीनंतर निर्माण होणारा कचरा व वेस्ट तात्काळ उचलण्यासाठी विशेष पथके कार्यरत राहणार असून परिसरात स्वच्छता राखण्यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. कुर्बानीसाठी मागील वर्षीप्रमाणे नेहरुनगर डॉक पॉइंट येथील जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती उप आयुक्त संदीप खोत यांनी यावेळी दिली.

बैठकीदरम्यान विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी पाणीपुरवठा अधिक प्रमाणात उपलब्ध करून देणे, जनावरे बांधण्यासाठी किमान तीन ते चार दिवस आधी अतिरिक्त जागा उपलब्ध करणे तसेच मंडप आणि पत्राशेड परिसरात सातत्याने स्वच्छता राखण्याबाबत सूचना मांडल्या. महापालिका प्रशासनाच्या वतीने या मागण्यांची योग्य दखल घेण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories