आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे यांच्याकडून निषेध
Apr 01 2026
52
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या वक्तव्याचा शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे यांच्याकडून निषेध
शासकीय नोकरी करताना आयुक्तांनी शहराचा परियच ठेवण्याचा आयुक्तांना दिला सल्ला
पिंपरी, ता. १ - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पिंपरी-चिंचवडबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. या वक्तव्याचा महापालिकेतील शिवसेना गटनेते विश्वजित बारणे यांनी निषेध केला आहे. ''पिंपरी-चिंचवड शहरात विकासाचे चांगले काम करण्याची भूमिका महापालिका आयुक्तांनी ठेवावी. चांगल्या कामाला आमचा पाठिंबा आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या अस्मितेला, अस्मितेविषयी कोण बोलत असेल तर तेवढ्याच आक्रमकपणे शिवसेना म्हणून विरोध केला जाईल.'', असा इशारा देत बारणे यांनी आयुक्तांनी चूक मान्य करावी असेही म्हटले आहे.
गटनेते विश्वजित बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड ही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली आणि चापेकर बंधूंसारख्या क्रांतीकारकांच्या बलिदानाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या नगरीला लाभला आहे. औद्योगिक, कामगारनगरी म्हणून हे शहर उदयाला आले. सर्वात वेगाने विकसित आणि लोकसंख्या वाढणारे शहर निर्माण झाले आहे.
या शहराची नगरपालिका कै. अण्णासाहेब मगर यांनी केली. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत नगरपालिका म्हणून परिचित होती. यामुळे भारतवासीयांना या शहराची ओळख आहे. आयटी हब म्हणून जगाच्या नकाशावर शहराचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे. या शहराला अनेक राजकीय नेत्यांचा वारसा लाभला आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना कदाचित हे माहिती नसेल. शासकीय नोकरी करीत असताना आयुक्तांनी शहराचा परिचय ठेवावा, असा सल्ला बारणे यांनी आयुक्तांना दिला आहे.