शहरातील नालेसफाईची कामे वेळेत, दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

शहरातील नालेसफाईची कामे वेळेत, दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश

शहरातील नालेसफाईची कामे वेळेत, दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, डॉ. विजय सूर्यवंशी यांचे निर्देश 

आरोग्य विभागाची आढावा बैठक, स्वच्छ सर्वेक्षणाच्या तयारीचाही घेतला आढावा

पिंपरी, ता. १ - ''पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नालेसफाईची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे व आस्थापनांवर कडक कारवाई करावी.'', असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बैठकीमध्ये शहरात सुरु असलेल्या नालेसफाईच्या कामाची माहिती आयुक्तांना देण्यात आली. 

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभागाची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे; उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, सीताराम बहुरे तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, डॉ. अभय दादेवर; मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंबासे; सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी स्वच्छ सर्वेक्षण-२०२६ च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचीही माहिती आयुक्तांनी घेतली.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ''शहरात पाणी साचू नये आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करावी. स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून नागरिकांनी कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.'' यावेळी, महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत शहरातील एकूण १४५ नाले आणि सुमारे ९४,९१३ मीटर लांबीच्या नाल्यांची सफाई सुरु असल्याची माहिती देण्यात आली. 

१६ मार्च रोजी केवळ ४.९९% असलेली प्रगती २३ मार्चपर्यंत १३.८३% झाली असून ३० मार्चपर्यंत ती २२.६७% पर्यंत पोहोचली आहे. क्षेत्रीय कार्यालयनिहाय प्रगती पाहता ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने ३२.२२% प्रगती साधत आघाडी घेतली आहे. ‘अ’ (२८.२८%) आणि ‘ई’ (२५.६३%) क्षेत्रीय कार्यालयांनीही चांगली कामगिरी केली असून ‘ब’ (२४.६७%) आणि ‘ग’ (२४.३३%) क्षेत्रीय कार्यालयांनीही स्पर्धात्मक वेग दाखवला आहे.

यावेळी, पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापन, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना, प्लास्टिक वापरावर कडक कारवाई आणि तीव्र उन्हाळ्यात उपलब्ध होणाऱ्या वैद्यकीय सुविधांचाही आढावा डॉ. सूर्यंवंशी यांनी घेतला.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories