पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी मुसळधार पाऊस .....
दुपारीच दाटून आलेला अंधार, वादळी वारा अन् ढगांच्या गडगडाटासह पाऊस धो-धो बरसला
पिंपरी, ता. २२ - पिंपरी-चिंचवडमध्ये शुक्रवारी (ता. २२) दुपारी चारच्या सुमारास अचानक अंधार दाटून आला आणि वादळी वारा अन् ढगांच्या गडगडाटासह पाऊस धो-धो बरसला. गेले तीन महिने उन्हाने साऱ्या सृष्टीची लाही-लाही होत होती. त्यानंतर शुक्रवारी साधरण तासभर पडलेल्या या मुसळधार पावसाने दिलासा मिळाला. अनेकजणांनी या मोठ्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला.
गेल्या पंधरवड्यात शहरात काही भागातच मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर तापमानात मोठी वाढ झाली होती. उन्हाने हैराण झाल्याने सारजण पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. हवामान विभागानेही येत्या २४ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला अन् दाट अंधार पसरुन मुसळधार पावसाला सुरवात झाली.
अचानक आलेल्या पावसाने रस्तोरस्ती अनेकांची तारांबळ उडाली आणि अनेकांनी पावसात चिंब भिजून घेतले. शाळांना सुट्टी असल्याने लहान मुलांसह मोठ्यांनाही पावसात भिजण्याचा आनंद घेतला. आज दुपारीच झालेले संध्याकाळचे वातावरण पाहण्यासाठी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांनीही कामांतून ब्रेक घेतला होता. शुक्रवारी झालेला पाऊस शहरभरात सगळीकडे कोसळला. मुख्य रस्त्यांवर, शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचले होते.