‘एलपीजी विरहित शहर’ संकल्पनेसाठी नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि एमएनजीएलने संयुक्तपणे पुढाकार घेण्याचे आयुक्तांचे आवाहन
‘एलपीजी विरहित शहर’ संकल्पनेसाठी नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि एमएनजीएलने संयुक्तपणे पुढाकार घेण्याचे आयुक्तांचे आवाहन
घरगुती पाईप गॅस वापर वाढीसाठी महापालिका, एमएनजीएल आणि गृहनिर्माण संस्थांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
पिंपरी, ता. २० - पिंपरी चिंचवड शहराला पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि आधुनिक इंधन व्यवस्थेकडे नेण्याचा महानगरपालिकेचा निर्धार आहे. देशातील अनेक शहरांमध्ये घरगुती पाईप गॅस प्रणालीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाईप गॅसचा वापर वाढविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी भविष्यात पिंपरी चिंचवडला देशातील पहिले ‘एलपीजी विरहित शहर’ बनविण्यासाठी गृहनिर्माण संस्था, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड तसेच नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याचे आवाहन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे, एलपीजी गॅसवरील अवलंबित्व कमी करणे तसेच नागरिकांमध्ये सुरक्षित आणि पर्यावरणपूरक इंधनाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल), गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी तसेच सहकार विभागाचे उपनिबंधक यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी होते, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, उप आयुक्त अण्णा बोदडे, उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक सहकार अधिकारी शशिकांत शृंगारे, बाळासाहेब घुगे यांच्यासह महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शंकर कुमार, स्वतंत्र संचालिका भाग्यश्री मंथळकर, संचालक शंकर करजागी, महाव्यवस्थापक रितेश इंगोले, अमोल हाथी, वरिष्ठ संचालक, वासुदेव गुरसाळी, प्रशांत खंदाडे, उपव्यवस्थापक अमोल वैद्य, सुनील पाटील, परम गोरे, संतोष बेना, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी प्रणव बी, तसेच विविध गृहनिर्माण संस्थांचे सुहास पटवर्धन, सचिन लोंढे, सचिन पाटील, संदीप कुंभार, संजिवन सांगळे, प्रताप भामरे, अधिक दिवे, चारूहास कुलकर्णी, सागर लोखंडे, राहुल मोकाशी आदी अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केंद्र शासनाने इंधन बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेच्या वापराबाबत केलेल्या आवाहनाचा संदर्भ देत शहरात एलपीजी गॅस सिलिंडरचा वापर टप्प्याटप्प्याने कमी करून घरगुती पाईप गॅसचा वापर वाढविणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले. नैसर्गिक वायू हा सुरक्षित, सातत्याने उपलब्ध होणारा आणि आधुनिक शहरी जीवनशैलीस पूरक पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये घरगुती पाईप गॅस प्रणाली यशस्वीपणे कार्यरत असून नागरिकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटीमध्ये पाईप गॅसचा वापर वाढविण्यासाठी नियोजनबद्ध मोहीम राबविणे आवश्यक आहे. भविष्यात पिंपरी चिंचवड शहराला देशातील पहिले “एलपीजी विरहित शहर” बनविण्यासाठी गृहनिर्माण संस्था, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड तसेच नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेऊन संकल्प करावा जेणेकरून हे ध्येय साध्य होईल, असे आवाहन देखील त्यांनी केले.
नागरिकांमध्ये पाईप गॅसबाबत विश्वास आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहिमेची आवश्यकता असल्याचे सांगत आयुक्तांनी सोशल मिडीया मोहिमा, माहितीपत्रकांचे वितरण, प्रशिक्षण शिबिरे, प्रत्यक्ष सोसायटी भेटी तसेच घरोघरी जाऊन जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. विशेषतः ज्या गृहनिर्माण संस्थांमध्ये एमएनजीएलचे कनेक्शन उपलब्ध असूनही नागरिकांकडून प्रत्यक्ष वापर केला जात नाही, अशा सोसायट्यांना प्राधान्याने लक्ष्य करून विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय, एमएनजीएलच्या वतीने समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांच्या शंका, तांत्रिक अडचणी आणि कनेक्शन प्रक्रियेबाबत त्वरित मार्गदर्शन करता येईल, असेही त्यांनी नमूद केले. गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत जास्तीत जास्त फ्लॅटधारकांना या योजनेत सहभागी करून घ्यावे, असेही आयुक्त डॉ. सूर्यवंशी यावेळी म्हणाले.
पाईप गॅस प्रणालीमुळे सिलिंडर साठवणुकीची गरज राहत नाही, गॅस पुरवठा अखंडित राहतो, वेळेची बचत होते तसेच पर्यावरणीय दृष्टीनेही हा पर्याय अधिक परिणामकारक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शहराच्या शाश्वत आणि स्मार्ट विकासाच्या दृष्टीने पाईप गॅसचा वापर वाढविणे हा महत्वाचा टप्पा ठरणार असल्याचा विश्वासही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
बैठकीदरम्यान एमएनजीएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे घरगुती पाईप गॅस योजनेची सविस्तर माहिती दिली. यामध्ये गॅस पाईपलाईनची कार्यपद्धती, एमएनजीएल अँपद्वारे उपलब्ध सेवा, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा, आर्थिक बाबी, सुरक्षिततेचे निकष तसेच घरगुती पाईप गॅसच्या वापरामुळे होणारे फायदे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.