news
clock
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले  यांच्या दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन, ११ ते १५ एप्रिल दरम्यान प्रदर्शन खुले राहणार 

पिंपरी, ता. ११ - ''क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा जो पाया घातला, तो भारतीय समाज परिवर्तनाच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा ठरला. त्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या सहकार्याने स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि महिलांना साक्षरतेच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा मार्ग दाखवला. आज स्त्रिया शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती करत असून प्रशासन, शिक्षण, विज्ञान, उद्योग, क्रीडा तसेच सामाजिक क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. ही प्रगती महात्मा फुले यांच्यामुळेच शक्य झाली आहे.'', असे प्रतिपादन महापौर रवी लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेस तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये तसेच पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात  झालेल्या अभिवादन कार्यक्रमास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुशाग्र कदम यांच्यासह महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, कार्यकारी अभियंता विनय ओहोळ, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. 

विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले, ''क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा त्याग, त्यांचे सामाजिक कार्य आणि समतेसाठी दिलेला लढा अतुलनीय असून भारतीय समाजाला दिशा देणारा आहे. त्यांनी शिक्षण, स्त्री-मुक्ती आणि सामाजिक न्यायाच्या माध्यमातून जे परिवर्तन घडवून आणले, ते आजही प्रेरणादायी आहे. अशा महापुरुषांचे विचार आणि साहित्य केवळ स्मरणदिनापुरते मर्यादित न राहता ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये या विचारांची रुजवण होणे गरजेचे असून त्यासाठी शैक्षणिक स्तरावर नियोजनबद्ध प्रयत्न होणे आवश्यक आहे. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वाचन उपक्रम तसेच विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख करून दिल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर सकारात्मक परिणाम होईल.'' 

आयुक्त विजय सूर्यवंशी यावेळी म्हणाले, ''क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या सामाजिक समतेच्या आणि शिक्षणाच्या कार्याला अभिवादन करताना, त्यांच्या विचारांचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या स्मारकाचे काम हे केवळ एक विकासकाम नसून, ते समाजप्रबोधनाचे आणि प्रेरणेचे केंद्र म्हणून उभे राहणार आहे. या स्मारकाचे काम प्राधान्याने व गतीने पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक ती सर्व प्रशासकीय कार्यवाही करण्यात येत असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.''

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन ......

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सामाजिक समता सप्ताह’ व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत पिंपरी येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध महत्त्वपूर्ण प्रसंगांचे दर्शन घडविणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन दिनांक ११ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा, सामाजिक परिवर्तनाच्या लढ्याचा आणि त्यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी क्षणांचा वेध घेणारी छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली असून, नागरिकांना त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा जवळून परिचय करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories