पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवडचे महापौर, आयुक्त आज सायकलवरुन महापालिकेत
May 15 2026
57
पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनानुसार पिंपरी-चिंचवडचे महापौर, आयुक्त आज सायकलवरुन महापालिकेत
पिंपरी, ता. १५ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल बाईकवरुन मंत्रालयात पोचले. त्यांच्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी आज, शुक्रवारी (ता. १५) सायकलवरुन महापालिकेत आले.
गुरुवारी (ता. १४) महापौर रवी लांडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस महापालिकेत येताना व परत जाताना सायकल किंवा इलेट्रीक वाहन किंवा सार्वजनिक वाहनाचा वापर करण्याचे आवाहन केले. यापुढे, आठवड्यातून एक दिवस मी सायकलने महापालिकेत येईन व परत जातानाही सायकलनेचे जाईन असे महापौरांनी सांगितले होते. त्यानुसार, महापौर स्वतः आज सायकलवरुन महापालिकेत आले. आयुक्तही सायकलवरुन आले.
यावेळी, महापौरांनी शहरात शेअरिंग सायकल योजना नव्याने सुरु केली जाईल व प्रमुख रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार केले जातील, असे सांगितले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, ''नागरीकांना इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी मी व महापौर आज सायकलवरुन महापालिकेत आलो आहोत. इंधन बचत करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे. सायकल प्रवास करताना सायकल ट्रॅकमध्ये येणाऱ्या अडचणी आमच्या लक्षात आल्या. त्यानुसार, सायकल ट्रॅक कसे चांगले होतील यासाठी पुढील काळात कार्यवाही केली जाईल.''