महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांच्या समाधान हेल्पलाईनवर केला फोन
पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांना चिखलीतील एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देणाऱ्याने महापौरांशी संपर्क न साधता पोलिसांच्या 'समाधान हेल्पलाईन'वर फोन करुन महापौरांना मारुन टाकण्याची धमकी दिली आहे. काल, मंगळवारी (ता. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास पोलिसांनी महापौरांना याबाबत माहिती दिली व धमकी देणाऱ्याचा फोटो दाखवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, मंगळवारी दुपारी ४ वाजता आशिष जमदाडे-पाटील या व्यक्तीने पोलिसांच्या समाधान हेल्पलाईनवर फोन करुन महापौर रवी लांडगे यांना मारुन टाकणार, अशी धमकी दिली. जमदाडे-पाटील हा मूळचा नगर येथील असून चिखली परिसरात राहतो आणि भोसरी एमआयडीसी परिसरात सुरक्षा रक्षकाचे काम करतो. शहरात क्रिडाक्षेत्राशी संबंधित आहे. तो महापौरांना दोन वर्षापूर्वी एक-दोनदा भेटून गेला असून, त्याने महापौरांना पुस्तकही भेट दिले आहे. त्यावेळी झालेल्या संवादात महापौरांनी त्याला इतर नागरीकांप्रमाणे मदतीचे आश्वासनही दिले आहे. जमदाडे-पाटील घटस्फोटित असल्याने आईवडिलांपासून वेगळे राहतो व मानसिकदृष्टया कमकुवत असल्याने अशी धमकी दिल्याची शक्यता आहे. सध्या पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले आहे.
याबाबत बोलताना महापौर रवी लांडगे म्हणाले, ''धमकी देणाऱ्याने समधान हेल्पलाईनवर फोन करुन मला मारुन टाकण्याची भाषा केली. मला किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याला धमकावण्याचा प्रकार केलेला नाही. पोलिसांनी त्या व्यक्तीला समज देऊन सोडून दिले आहे. पोलिसांनी मला संरक्षण दिले आहे. ''
