पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील हवालदार भगवंता मुठे यांचे अपघाती निधन
पिंपरी, ता. १६ - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा पथकातील पोलिस हवालदार भगवंता चिंधू मुठे (वय ४१ वर्षे) यांचे गुरुवारी (ता. १४) अपघाती निधन झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे हिलेदेव घाटात रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा पथकात मुठे कार्यरत होते. ते घरातील लग्नासाठी गावी गेले होते. दिवसभर लग्नासाठी थांबून ते त्यांच्या मूळ गाव सापेवाडी येथे गुरुवारी निघाले होते. त्यांचा मेहुणा, मुलगा आणि ते मोटारीमध्ये प्रवास करत होते. हिलेदेव घाटात मेहुणा मोटार चालवत असताना त्याचे मोटारीवरील नियंत्रण सुटले आणि मोटार २०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात मुठे गंभीर जखमी झाले. या परिस्थितीत त्यांनी मोबाइलवरुन घरी आणि सहकारी पोलिसांना फोन करून अपघाताची माहिती दिली होती. उपचारासाठी नेत असताना मुठे यांचा मृत्यू झाला. त्याचा मेहुणा आणि मुलगा जखमी झाले आहेत.
मुठे यांच्या निधनाने सापेवाडी गावावर शोककळा पसरली. मुठे यांच्यावर शुक्रवारी (ता. १५ ) दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई, वडील असा परिवार आहे.