जूनमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ४७ हजार ७६६ टन कचऱ्याचे संकलन
कचरा विलगीकरणास नागरिकांचा वाढता प्रतिसाद
पिंपरी, ता. ७ जुलै २०२६ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून जून महिन्यात शहरातून एकूण तब्बल ४७ हजार ७६६.७८५ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. स्त्रोत पातळीवर कचऱ्याचे विलगीकरण, स्वतंत्र संकलन आणि वैज्ञानिक प्रक्रियेला दिलेल्या प्राधान्यामुळे शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक परिणामकारक होत असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, जून महिन्यात ३५ हजार २३.६०० टन सुका कचरा, ६ हजार ७३१.३२० टन ओला कचरा, ४ हजार ९७.८५० टन मिश्र कचरा, १ हजार ११८.२२५ टन ग्रीन वेस्ट, ४७९.२२५ टन चिकन वेस्ट आणि ३१६.५६५ टन मंडई वेस्ट संकलित करण्यात आला. संकलित कचऱ्यावर विविध प्रक्रिया केंद्रांमध्ये वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून पुनर्चक्रीकरण तसेच वसुंधरापूरक व्यवस्थापन करण्यात येत आहे. त्यामुळे लँडफिलवरील ताण कमी होण्यासह नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनालाही चालना मिळत आहे.
महापालिकेने घराघरांतून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्यासाठी सातत्याने जनजागृती मोहीम राबविली आहे. त्याला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, कचरा विलगीकरणाचे प्रमाण वाढल्याने कचऱ्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि प्रभावी होत आहे. त्याचबरोबर ग्रीन वेस्ट, मंडई वेस्ट आणि इतर विशेष प्रकारच्या कचऱ्याचे स्वतंत्र संकलन केल्यामुळे पर्यावरणपूरक घनकचरा व्यवस्थापनाला बळ मिळत आहे.
महापौर रवी लांडगे म्हणाले, "स्वच्छ शहराची सुरुवात प्रत्येक घरातून होते. नागरिकांनी घरच्या घरी ओला व सुका कचरा विलग करून महापालिकेला सहकार्य केल्यास कचऱ्याचे पुनर्चक्रण अधिक प्रभावीपणे करता येते. स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग हीच सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक नागरिकाने कचरा विलगीकरणाची सवय अंगीकारून 'झिरो वेस्ट सिटी'च्या संकल्पनेला बळ द्यावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले की, "घनकचरा व्यवस्थापन ही केवळ स्वच्छतेची बाब नसून पर्यावरण संवर्धनाशी निगडित महत्त्वाची जबाबदारी आहे. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्चक्रण आणि वैज्ञानिक प्रक्रिया यावर सातत्याने भर दिला जात आहे. नागरिकांनी कचरा विलगीकरणाची सवय अधिक प्रभावीपणे अंगीकारल्यास 'झिरो वेस्ट सिटी'चे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होईल आणि भावी पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ व हरित शहर निर्माण करता येईल.
तर अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यावेळी बोलताना म्हणाले की, "जून महिन्यातील कचरा संकलनाची आकडेवारी ही नागरिकांच्या वाढत्या सहभागाची साक्ष आहे. घरातूनच कचरा विलगीकरण केल्यामुळे संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि पुनर्चक्रणाची संपूर्ण यंत्रणा अधिक कार्यक्षम होत आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाने कचरा व्यवस्थापनात भागीदार म्हणून योगदान दिल्यास पिंपरी चिंचवड स्वच्छतेच्या बाबतीत देशात आदर्श ठरेल.
आरोग्य विभागाचे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले की, "कचऱ्याचे योग्य वर्गीकरण ही प्रभावी घनकचरा व्यवस्थापनाची गुरुकिल्ली आहे. जून महिन्यातील कचरा संकलनातून नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. ओला, सुका आणि विशेष प्रकारचा कचरा स्वतंत्रपणे दिल्यास त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणे आणि पुनर्चक्रणाचे प्रमाण वाढविणे अधिक सुलभ होते. प्रत्येक नागरिकाच्या सहभागातूनच स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी चिंचवड घडविण्याचे उद्दिष्ट साध्य होईल."
महापालिकेने नागरिकांना घरातूनच ओला, सुका तसेच सॅनिटरी कचरा, विशेष काळजी योग्य कचरा अशा चार प्रकारे कचरा विलग करूनच महापालिकेच्या घंटागाडीत देण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, हरित आणि शाश्वत शहर घडविण्याच्या दिशेने सातत्याने प्रगती करत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.