पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात 'एन के' मालिकेतील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात 'एन के' मालिकेतील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी ‘एनके’या मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरुन हवे असतील; अशा चारचाकी वाहन मालकांनी २० मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा.
दुचाकी मालिकेतील उर्वरित आकर्षक नोंदणी क्रमांक दुचाकी वाहनांसाठी आरक्षित करण्यासाठी २१ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा, अशी माहिती पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठीचे अर्ज कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधारकार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा. हा डीडी ‘डी.वाय.आर.टी.ओ., पिंपरी चिंचवड’ यांच्या नावे राष्ट्रीयकृत, अनूसचित बँकेचा पुणे येथील असावा. अर्जदाराने ओळख पटविण्यासाठी अर्जासोबत फोटो ओळखपत्र तसेच पत्त्याच्या पुराव्यासाठी आधारकार्ड, दूरध्वनी देयक आदींची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.
चारचाकी वाहनांसाठी क्रमांकांची यादी २१ मे रोजी सकाळी कार्यालयीन सूचना फलकावर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावासाठी जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास त्याच दिवशी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. तसेच दुपारी ३.३० वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित अर्जदारांसमोर लिफाफे उघडून विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे.
दुचाकीची यादी २२ मे रोजी कार्यालयीन सूचना फलकांवर लावण्यात येईल. दुचाकीसाठी अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असल्यास २२ मे रोजी दुपारी २.३० पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात नोंदणी प्राधिकारी यांच्या उपस्थितीत लिफाफे उघडून जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केलेल्या अर्जदारास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाणार आहे. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून मिळणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.