आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महापौर रवी लांडगे यांनी केली स्वगणना, नागरीकांनाही स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व महापौर रवी लांडगे यांनी केली स्वगणना, नागरीकांनाही स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन
पिंपरी, ता. ४ - महाराष्ट्रात जनगणनेच्या पहिल्या स्वगणनेच्या टप्प्याला '१ मे'पासून प्रारंभ झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व महापौर रवी लांडगे यांनी स्वतः स्वगणना करुन शहरात नागरिकांनाही स्वगणनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात येथे १ मे महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी https://se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सर्व ३४ प्रश्नांची माहिती ऑनलाइन भरत स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. महापौरांनीही स्वगणना पूर्ण केली. त्यानंतर त्यांना ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ प्राप्त झाला. स्वतः पुढाकार घेत स्वगणना करुन त्यांनी नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी, डॉ.विजय सूर्यवंशी म्हणाले, ''जनगणना ही केवळ आकडेवारी नसून ती देशाच्या विकासाचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाने अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. स्वगणना ही सोपी, सुरक्षित आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.'' महापौर रवि लांडगे म्हणाले, ''जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. अचूक माहितीमुळे शासनाला योग्य नियोजन करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या उपक्रमात सहभागी व्हावे. १ मे ते १५ मे २०२७ या कालावधीत स्वगणना सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.''
महाराष्ट्रात १ मे पासून जनगणनेतील स्वगणना टप्पा सुरु झाला आहे. १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांमार्फत घरोघरी भेट देऊन उर्वरित जनगणना प्रक्रिया पार पडणार आहे. अधिकाधिक शहरवासियांनी स्वगणनेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सू्र्यवंशी व महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.