अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या तीन महिला नागरिकांवर कारवाई

अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या तीन महिला नागरिकांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड | १४ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत व्हिसाची मुदत संपल्यानंतरही अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या युगांडा देशातील तीन महिला नागरिकांवर परकीय नागरिक नोंदणी विभागाने (FRO) कारवाई केली आहे. या तिन्ही महिला हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुंजी परिसरात राहत असल्याचे तपासात समोर आले. संबंधित महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि पोलीस उपायुक्त, विशेष शाखा यांच्या सूचनेनुसार शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत परकीय नागरिक नोंदणी विभागातील पोलीस निरीक्षक राजश्री पावरा यांनी गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने माहिती मिळवली.

त्यानुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारुंजी येथे काही आफ्रिकन महिला नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस पथकाने मारुंजी येथील हॅपी होम्स परिसरात जाऊन पडताळणी केली. या वेळी तीन युगांडाच्या महिला नागरिक आढळून आल्या.

पोलिसांनी त्यांची नावे DORECK AHAISBIWE, PROSSY ANKUNDA आणि AMINA KATUSIIME अशी असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्याकडील पासपोर्ट आणि व्हिसाच्या प्रती तपासण्यात आल्या. त्यानंतर IVFRT प्रणालीद्वारे भारतात येण्याची तारीख आणि व्हिसाच्या वैधतेची अधिक तपासणी करण्यात आली.

तपासात DORECK AHAISBIWE या महिला नागरिकाकडे विद्यार्थी व्हिसा असल्याचे आढळले. तिच्या व्हिसानुसार भारतात राहण्याची मुदत ७ ऑक्टोबर २०२६ रोजी संपली होती. दुसरी महिला PROSSY ANKUNDA हिच्याकडे वैद्यकीय व्हिसा होता. तिच्या भारतातील वास्तव्याची मुदत २९ डिसेंबर २०२५ रोजी संपली होती.

तिसरी महिला AMINA KATUSIIME हिच्याकडेही वैद्यकीय व्हिसा होता. तिच्या व्हिसाची मुदत ११ नोव्हेंबर २०२५ रोजी संपल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, तिन्ही महिला नागरिकांनी व्हिसाची मुदत संपल्यानंतर भारतात राहण्यासाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ घेतली नव्हती. त्यामुळे त्यांचे वास्तव्य अनधिकृत (Overstay) असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईनंतर तिन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आले असून, परकीय नागरिक नोंदणी विभागामार्फत त्यांना युगांडा येथे परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी शहरातील नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. परदेशी नागरिकांना रूम, बंगला, फ्लॅट किंवा हॉटेलमध्ये वास्तव्यास ठेवताना सी-फॉर्म (C-Form) भरून २४ तासांच्या आत त्यांची माहिती परकीय नागरिक नोंदणी विभागाला देणे बंधनकारक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

परदेशी नागरिकांच्या वास्तव्याची माहिती न दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच परिसरात कोणताही परदेशी नागरिक अनधिकृतपणे राहत असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परकीय नागरिक नोंदणी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त धीरज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परकीय नागरिक नोंदणी विभागाच्या पथकाने केली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories