पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सक्षम 'पार्किंग पॉलिसी' लवकरच - अभिषेक बारणे
पिंपरी-चिंचवड शहर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी सक्षम 'पार्किंग पॉलिसी' लवकरच - अभिषेक बारणे
नव्या पार्किंग धोरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि व्यावहारिक उपायांचा समावेश
पिंपरी, ता. २० - पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. शहरात एक सक्षम आणि शिस्तबद्ध 'पार्किंग पॉलिसी' तयार करण्यासाठी बीआरटीएस विभाग आणि महापालिकेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयाने हे नवे धोरण लवकरच शहरात अंमलात आणले जाणार आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली आहे.
या बैठकीदरम्यान बीआरटीएस विभागाकडून नवीन पार्किंग पॉलिसीचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणामध्ये धोरणाची तांत्रिक आणि व्यावहारिक बाजू मांडण्यात आली. त्यावर सर्व बाजूंनी सविस्तर चर्चा झाल्यानंतर, धोरण अधिक लोकाभिमुख आणि त्रुटीरहित करण्यासाठी काही महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यक दुरुस्त्या व सुधारणा करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्याकडून देण्यात आल्या. या सूचनांचा समावेश करुन हे नवीन पार्किंग धोरण अत्यंत प्रभावीपणे आणि लवकरच अंमलात आणले जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या नव्या पार्किंग धोरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि व्यावहारिक उपायांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक भागाच्या गरजेनुसार 'एरिया बेस्ट पार्किंग' व्यवस्था विकसित केली जाईल, तर नागरिकांच्या सोयीसाठी 'कलर कोडिंग सिस्टीम' लागू केली जाणार आहे. याशिवाय, रस्त्यालगत घर असणाऱ्या स्थानिक रहिवाशांना त्रास होऊ नये म्हणून त्यांना विशेष 'पार्किंग परमिट' दिले जाईल. शहरातील मुख्य रस्त्यांवर होणारी जड वाहनांची पार्किंग पूर्णपणे बंद करून त्यांच्यासाठी शहराबाहेर जागा निश्चित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, अनावश्यक पार्किंग टाळण्यासाठी थेट सॅटेलाईटद्वारे जागांची पडताळणी करण्यात येणार असून, या संपूर्ण व्यवस्थेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र 'पार्किंग मॅनेजमेंट' कक्ष स्थापन केला जाईल. या धोरणात वाहनचालकांसह पादचारी आणि सायकलस्वारांसाठीही स्वतंत्र व सुरक्षित जागा सुनिश्चित करण्यात आली आहे. या बैठकीला सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार, आयटीडीपी चे प्रतिनिधी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
उत्तम पार्किंग धोरण लवकरच.....
''पिंपरी-चिंचवड वेगाने वाढणारे शहर असून येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ तात्पुरते उपाय करून चालणार नाही, तर एक शाश्वत आणि शिस्तबद्ध यंत्रणा उभारण्याची गरज आहे. याच उद्देशाने आम्ही या नव्या पार्किंग धोरणावर सविस्तर चर्चा केली आहे. बीआरटीएस विभागाच्या सादरीकरणानंतर त्यात अधिक सुधारणा करण्यासाठीच्या सूचना केल्या आहेत, ज्या या धोरणाला अधिक परिपूर्ण बनवतील. हे धोरण राबवताना केवळ वाहतूक सुरळीत करणे एवढाच हेतू नसून, पादचारी आणि सायकल चालवणाऱ्यांनाही सुरक्षित रस्ते मिळवून देणे हा आमचा प्रयत्न आहे. ऑन-स्ट्रीट आणि ऑफ-स्ट्रीट पार्किंगचे दर ठरवताना सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. सर्व तांत्रिक त्रुटी दूर करून, 'आपले शहर, आपली शिस्त' या भावनेतून हे उत्तम पार्किंग धोरण लवकरच नागरिकांच्या सेवेत आणले जाईल.''
- अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती, पिंपरी चिंचवड महापालिका