पिंपरी-चिंचवडच्या वीजपुरवठा सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी सहकार्याचे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे आश्वासन, आमदार महेश लांडगे यांनी मांडली लक्षवेधी
पिंपरी, ता. २ - विधानसभा अधिवेशनात नियम १०५ अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील वीज पुरवठा सक्षमीकरणाच्या अनुशंगाने विविध मागण्याची लक्षवेधी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात मांडली. त्यावर, पिंपरी-चिंचवडसह भोसरी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या औद्योगिक व निवासी वीज समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक आहे. नवीन प्रस्तावित विकासकामे आणि पायाभूत प्रकल्पांसाठी आवश्यक निधीची पूर्तता करण्यात येईल. वीज पुरवठा सक्षम करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले.
आमदार महेश लांडगे यांनी सांगितले की, गणेशखिंड शहर मंडळांतर्गत भोसरी, चहोली, मोशी, तळवडे, चिखली आदी भागांमध्ये सध्या औद्योगिक, व्यावसायिक व निवासी अशा एकूण ४ लाख ५३ हजार ८२० ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. यामध्ये ५८० उच्चदाब ग्राहक आहेत. महापारेषणच्या चार २२० के.व्ही. उपकेंद्रांद्वारे भोसरी आर एस-१ (२७५ एम.व्ही.ए.), भोसरी आर एस-२ (१५० एम.व्ही.ए.), टेल्को (१५० एम.व्ही.ए.), चिंचवड आर एस (२३० एम.व्ही.ए.) : एकूण ८०५ एम.व्ही.ए. स्थापित क्षमता उपलब्ध असून सध्याची मागणी ६२७ एम.व्ही.ए. पर्यंत पोहोचली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे भविष्यातील ताण लक्षात घेता अतिरिक्त पायाभूत सुविधा उभारण्याची गरज आहे. त्यावर, २०० केव्ही मोशी आणि २०० केव्ही चऱ्होली येथे उपकेंद्र तयार केली आणि प्रस्तावित सदरची कामे पूर्ण केल्यानंतर वीज समस्या सोडवण्यास मदत होईल, असे बोर्डीकर- साकोरे यांनी सांगितले.
वीज चोरीच्या प्रकरांना आळा घालण्यासाठी तसेच नवीन केबल, वीज कर्मचाऱ्यांचा अभाव, देखभाल-दुरूस्तीच्या कामांत दिरंगाई अशा समस्यांवर ठोस उपायोजना करण्यासाठी लघु उद्योजक संघटना, स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घ्यावी, अशी मागणी आमदार लांडगे केली. यावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर- साकोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
ऊर्जा विभागाने पुढील प्रकल्पांना गती दिली जाणार असल्याचे सांगितले. मोशी येथील सफारी पार्कमध्ये अतिउच्चदाब (EHV) उपकेंद्र - मोशी, डुडुळगाव, आकुर्डी, चिखली, तळवडे परिसरातील वीजपुरवठा अधिक स्थिर होणार आहे. चहोली येथे नवीन EHV उपकेंद्र - भोसरी, चहोली, दिघी, धानोरी भागात पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होणार आहे. सेंच्युरी इंका EHV उपकेंद्रात दोन नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा प्रस्ताव आहे तसेच मध्यम दाब स्विचिंग स्टेशनसाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
भोसरी गावठाणातील ओव्हरहेड वीजवाहिन्या आरडीएसएस योजनेंतर्गत टप्प्याटप्प्याने भूमिगत करण्यात येणार आहेत. तळवडे येथील देवी इंद्रायणी स्विचिंग उपकेंद्रातून स्वतंत्र फीडर व भूमिगत केबल टाकण्याचे काम तातडीने हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपाययोजनांमुळे वारंवार होणारे वीजखंडित प्रकार कमी होतील. औद्योगिक उत्पादनात सातत्य राहील. निवासी भागात सुरक्षित आणि स्थिर वीजपुरवठा मिळेल. विशेष म्हणजे, वाढत्या शहरीकरणाचा विचार करून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित प्रस्तावांना प्राधान्याने मान्यता देण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.