रुग्णालयातील मेडिकल व्यवसायाच्या आमिषाने २३ लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा
Mar 12 2026
57
रुग्णालयातील मेडिकल व्यवसायाच्या आमिषाने २३ लाखांची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा
पिंपरी, ता. १२ - रुग्णालयातील मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो, असे आमिष दाखवून एका महिलेकडून २३ लाख रुपये डिपॉझिट स्वरूपात घेतल्याचा आणि नंतर पैसे परत न करता बनावट सह्या करुन बनावट करार तयार केल्याचा प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २२ एप्रिल २०२४ पासून आतापर्यंत कुदळे आळी, सावता माळी मंदिराजवळील आयुश्री मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या मोशी येथील कार्यालयात घडला. याबाबत ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.५६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी विलास वसंत डांगे (रा. अंजना हाऊसिंग सोसायटी, रहाटणी), एक महिला आरोपी आणि नोटरी अॅड. गोविंद पाटील (रा. पाचपिर चौक, काळेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपी विलास डांगे यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधील मेडिकलमध्ये मोठा व्यवसाय होत असल्याचे सांगून परताव्याच्या अटीवर २३ लाख रुपये डिपॉझिट घेतले. मात्र प्रत्यक्षात मेडिकलमध्ये व्यवसाय नसल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी महिलेने मेडिकलचा ताबा आरोपीकडे देत पैसे परत मागितले. त्यावर आरोपीने पैसे परत दिले नाहीत.
याचदरम्यान आरोपींनी फिर्यादीच्या बनावट सह्या करून नोटरीकडे बनावट समझोता करार तयार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर हा करार आणि बनावट अर्ज अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात सादर करून फिर्यादीचे मेडिकल परवाना (लायसन्स) सरेंडर करण्यात आला. पुढे आरोपीने आपल्या पत्नी व फार्मासिस्टच्या नावाने नवीन लायसन्स घेऊन पुन्हा व्यवसाय सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे.