मद्यपान करुन झोपी गेलेल्या तरुणाचे चांदीचे ब्रेसलेट अन् मोबाईल लंपास
पिंपरी, ता. १९ - मद्यपान केल्यानंतर त्याच ठिकाणी रात्रभर झोपलेल्या तरुणाच्या हातातील चांदीचे ब्रेसलेट व खिशातील मोबाईल चोरीला गेला आहे. हा प्रकार शनिवारी (ता. १६) रात्री ते रविवारी (ता. १७) सकाळी ६ यावेळेत पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या मागे मोकळया मैदानात घडला आहे. अज्ञात चोरट्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
याबाबत, वस्तू चोरीला गेलेला तरुण अनिकेत सुधाकर सोनवणे (वय २७ वर्ष, ज्वेलर्सचे दुकान, रा. बोपोडी) याने तक्रार दिली. अनिकेत शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकच्या मागे मोकळया मैदानात दारु पिण्यासाठी बसला. त्यानंतर त्याला तिथेच झोप लागली. जाग आल्यानंतर रविवारी (ता. १७) सकाळी ६ च्या सुमारास तो घरी जाऊ लागला. तेव्हा त्याचा मोबाईल व हातातील चांदीचे ब्रेसलेट चोरीला गेल्याचे लक्षात आले.
अनिकेतने तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्याविरुद्ध संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.