शहरात पाणीपुरवठ्याचे नवे वेळापत्रक रविवारपासून लागू होणार
पिंपरी, ता. २६ - सध्या शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. पाटबंधारे विभागाकडून पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा नियोजनबद्ध आणि संतुलित व्हावा, यासाठी महापालिकेने रविवारपासून (ता. २८) पाणीपुरवठ्याच्या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरातील विविध भागांना किमान एक तास, तर कमाल तीन तास पाणीपुरवठा केला जाणार आहे.
सध्या शहरातील अनेक भागांत कमी दाबाने किंवा कमी वेळ पाणी मिळत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने पाणी वितरणाचा आढावा घेऊन प्रभाग निहाय वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने सर्व क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्र वेळापत्रक तयार केले आहे. हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नव्या नियोजनानुसार संबंधित भागातील लोकसंख्या, जलवाहिन्यांची क्षमता, उंच-सखल भूभाग, पाण्याचा दाब आणि वितरण व्यवस्था लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याची वेळ वाढणार असून, काही भागांमध्ये केवळ वेळेत बदल होणार आहे, अशी माहिती सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी दिली.
पाणी बचतीच्या उपक्रमांना सहकार्य करावे....
''शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता उपलब्ध जलस्रोतांवर ताण वाढत आहे. त्यामुळे पाणी जपून वापरणे आवश्यक आहे. नागरिकांनी पाण्याचा पुनर्वापर करण्यास प्राधान्य द्यावे आणि पाणी बचतीच्या उपक्रमांना सहकार्य करावे. पावसाच्या पाण्याचे संकलन आणि साठवणुकीवर भर द्यावा.'' - डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, महापालिका