'रोड सेफ्टी सारथी मित्र' उपक्रमांतर्गत पीएमपीएमएल चालक आणि सेवकांना प्रशिक्षण
पिंपरी, ता. १७ जुलै २०२६ - कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड आणि सिनर्जी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'रोड सेफ्टी सारथी मित्र' उपक्रमांतर्गत पीएमपीएमएल चालक व सेवकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडत आहे . या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश चालक सेवकांमध्ये सुरक्षित वाहनचालना, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन, प्रवाशांप्रती संवेदनशीलता, उत्कृष्ट सेवा संस्कृती आणि अपघातमुक्त परिवहन व्यवस्था निर्माण करणे हा आहे.
प्रशिक्षणा दरम्यान चालक सेवकांना सुरक्षित व जबाबदारीने वाहन चालविण्याचे महत्त्व, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, मानसिक ताण-तणावाचे व्यवस्थापन तसेच शांत, संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून सेवा देण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय प्रवाशांशी सौजन्यपूर्ण, आदरयुक्त आणि प्रभावी संवाद कसा साधावा, याविषयीही माहिती देण्यात येत आहे .
या प्रशिक्षणामध्ये चालक सेवकांना आयुष्मान भारत कार्ड, विविध शासकीय आरोग्य योजना, त्या योजनांचा लाभ घेण्याची प्रक्रिया, डिजिटल पेमेंट, ऑनलाइन व्यवहार, सायबर सुरक्षितता, डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी तसेच दैनंदिन जीवनात आधुनिक डिजिटल सुविधांचा सुरक्षित वापर याबाबतही सखोल मार्गदर्शन करण्यात येत आहे .
प्रशिक्षण केवळ तांत्रिक ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता चालक सेवकांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आला. सहभागी चालक सेवकांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना टी-शर्ट भेट देण्यात आले. या उपक्रमाला चालक सेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रशिक्षणानंतर सर्व सहभागी चालक सेवकांनी सुरक्षित, शिस्तबद्ध, जबाबदार आणि प्रवासी-केंद्रित सेवा देण्याचा संकल्प केला.
कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड आणि सेनर्जी संस्था यांच्या (CSR initiatives) सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून राबविण्यात येणारा 'रोड सेफ्टी सारथी मित्र' हा उपक्रम सुरक्षित वाहनचालना, आरोग्य जागरूकता, डिजिटल सक्षमीकरण, सामाजिक उत्तरदायित्व आणि उत्कृष्ट प्रवासी सेवा यांचा प्रभावी संगम घडवून आणत आहे. अशा उपक्रमांमुळे चालक सेवकांचे कौशल्य अधिक सक्षम होऊन अपघातमुक्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह सार्वजनिक परिवहन व्यवस्था निर्माण करण्यास निश्चितच मोठी मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.