आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी व भाविकांसाठी 'पीएमपीएमएल'कडून विशेष बससेवा
आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त वारकरी व भाविकांसाठी 'पीएमपीएमएल'कडून विशेष बससेवा
पिंपरी, ता. १० जुलै २०२६ - संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो वारकरी, भाविक आणि नागरिक पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाले. शनिवारी (ता. ११) पालखी सोहळा पुण्यातून पुढे मार्गस्थ होत आहे. पुढेही वारकऱ्यांच्या व भाविकांच्या प्रवासासाठी 'पीएमपीएमएल'कडून खास बससेवेचे नियोजन केले आहे. सर्व वारकरी, भाविक व प्रवासी नागरिकांनी पालखी सोहळ्यादरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेल्या या विशेष बससेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात येत आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी, भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विशेष बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार बसेसचे संचलन करण्यात येणार आहे.
दि. ११ जुलै २०२६ रोजी परतीच्या प्रवासासाठी विशेष बससेवा
सासवड येथून वारकऱ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी ६० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
याशिवाय मार्गावरील ४० नियमित बसेस कार्यरत राहतील.
अशा प्रकारे एकूण १०० बसेसद्वारे प्रवाशांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
* दि. ११ जुलै २०२६ रोजी बोपदेव घाट मार्गे बसवाहतूक
दि. ११ जुलै २०२६ रोजी हडपसर-सासवड दरम्यानचा दिवेघाट मार्ग वाहतुकीस पूर्णतः बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन महामंडळाच्या बसेस दिवेघाटाऐवजी बोपदेव घाट मार्गे संचलनात राहतील.
या पर्यायी मार्गावरील बससेवा स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर व कात्रज येथून नियमितपणे उपलब्ध राहणार आहे.
* दि. १२ जुलै २०२६
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम सासवड येथे असल्यामुळे सहभागी वारकरी, भाविक व नागरिकांना सासवड-नारायणपूर तसेच प्रतिबालाजी मंदिर येथे दर्शनासाठी जाणे-येणे सुलभ व्हावे यासाठी २० अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.