news
clock

डॉ. अभिजीत चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त, डॉ. योगेश म्हसे यांची बदली 

पिंपरी, ता. ५ - नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या महानगर आयुक्तपदी म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. पीएमआरडीएचे सध्याचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. बदलीसंदर्भातील आदेश राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सुभाष उमराणीकर यांनी बुधवारी (ता. ४) सायंकाळी काढण्यात आला.

डॉ. चौधरी हे भारतीय प्रशासकीय सेवेतील सन २०१० बॅचचे आयएएस अधिकारी असून जुलै २०२३ पासून ते नागपूर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणून कार्यरत होते. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नागरी सुविधांमध्ये सुधारणा, प्रशासनातील पारदर्शकता आणि स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या गतीकरणावर विशेष भर दिला. त्यांच्या कार्यकाळात नागपुरात इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढली, ई-प्रशासकीय सुधारणा राबवल्या गेल्या तसेच विविध पायाभूत प्रकल्पांना गती मिळाली. जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी ते छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर महापालिकेचे आयुक्तही राहिले आहेत. भंडारा व सांगली जिल्हाधिकारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. 

तर, डॉ. म्हसे यांनी जून २०२४ मध्ये तत्कालीन आयुक्त राहुल महिवाल यांच्या हस्ते पीएमआरडीएच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांनी 'पीएमआरडीए'च्या अनेक प्रकल्पांना गती दिली. सेक्टर १२ येथील गृहप्रकल्पांतील त्रुटीबाबत स्ट्रक्चरल ऑडिट, मेट्रोच्या संथ कामांना गती देण्यासाठी कंत्राटदार कंपनीला नोटीस, अनधिकृत हॉटेल्स व होर्डिंगवर कारवाई यासोबतच अनधिकृत बांधकामांवर फौजदारी गुन्हे दाखल केले. आता नव्या आयुक्तांना  माण-हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो वेळेत धावणे, गृहप्रकल्प, इंद्रायणी, पवना- मुळा नदीसुधार प्रकल्प, २० नगररचना योजना हे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत.  

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance