पीएमआरडीए कार्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आढावा बैठक
पिंपरी, ता. १६ - प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन विकासकामे वेगाने पूर्ण करावीत, असे निर्देश पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पीएमआरडीए प्रशासनाला दिले. डॉ. सूर्यवंशी यांनी बुधवारी (ता. १५) आकुर्डी येथील पीएमआरडीए (पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण) मुख्यालयाला भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
या आढावा बैठकीत अभियांत्रिकी विभागामार्फत सुरु असलेल्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. प्रकल्प समन्वय सुधारण्यावर विशेष चर्चा झाली. ''पीएमआरडीए आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संयुक्त प्रकल्पांमध्ये सुसूत्रता आणून त्यांची अंमलबजावणी अधिक प्रभावी झाली पाहिजे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराच्या एकात्मिक विकासासाठी पीएमआरडीए व पिंपरी-चिंचवड महापालिका यांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे.'' , असे डॉ. सूर्यवंशी म्हणाले.
यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, उपायुक्त हिंमत खराडे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, विकास परवानगी विभाग संचालक अविनाश पाटील, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, मुख्य वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.