पीएमआरडीएच्या इनर रिंगरोड प्रकल्पासाठी १२० हेक्टर जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण
पिंपरी, ता. ८ - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) इनर रिंगरोड प्रकल्पासाठी ११ गावांतील १२० हेक्टर जमिनींची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे आणि जमिनींचे भरपाई दर निश्चित केले आहेत आणि भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरु होईल, अशी माहिती पीएमआरडीए प्रशासनाने दिली.
इनर रिंग रोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील सोळू ते वडगाव शिंदे भूसंपदनासाठी पीएमआरडीएने ११३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण, मोजमाप व भरपाईचा अहवाल तयार करुन तो 'पीएमआरडीए'कडे सादर केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहर आणि आसपासच्या भागातील वाहतूक कोंडीचा त्रास कमी व्हावा, यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यात उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत, असे 'पीएमआरडीए' प्रशासनाने सांगितले.
याबाबत बोलताना पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, ''रिंगरोड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात आलेली आहे. ११ गावांतील जमिनींची सयुंक्त मोजणी पूर्ण झाली आहे. जमीन संपादन प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.''