पोलिस भरती प्रक्रियेतील वैद्यकीय तपासणीत महिला उमेदवाराची गैरवर्तणूक
पुणे, ता. १८ - पोलिस भरतीच्या प्रक्रियेदरम्यान डोळ्यांच्या वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या एका महिला उमेदवाराने स्वतःऐवजी दुसऱ्या डमी तरुणीला तपासणीसाठी उभे केल्याचे उघडकीस आले आहे. ससून रुग्णालयात गुरुवारी (ता. १६) ही तपासणी सुरु होती. या प्रकरणी संबंधित महिला उमेदवाराविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस मुख्यालयातील अंमलदार सुजाता राजू पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार महिला उमेदवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस भरतीतील एका महिला उमेदवाराची डोळ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर, डॉक्टरांनी तिला अपात्र ठरवून केस पेपरवर 'रेफर टू बोर्ड' असा शेरा मारला होता. हे माहिती असतानाही, आरोपींनी संगनमत करुन तिच्या केसपेपरवर डमी महिलेला डोळ्यांच्या तपासणीसाठी रांगेत उभे करुन गैरवर्तणूक केली.