लोहगाव विमानतळावर शुक्रवारी भारतीय हवाई दलाच्या 'सुखोई' लढाऊ विमानाचा धावपट्टीवर उतरताना अपघात
Apr 18 2026
40
लोहगाव विमानतळावर शुक्रवारी भारतीय हवाई दलाच्या 'सुखोई' लढाऊ विमानाचा धावपट्टीवर उतरताना अपघात
पुणे, ता. १८ - लोहगाव विमानतळावर शुक्रवारी (ता. १८) रात्री भारतीय हवाई दलाच्या 'सुखोई' लढाऊ विमानाचे धावपट्टीवर उतरत असताना 'हार्ड लँडिंग' झाले. या अपघातानंतर विमानाने पेट घेतला. या अपघातानंतर प्रवासी विमान वाहतूक विस्कळित झाली. पुण्याहून बाहेर जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. इतर शहरांतून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या विमानांनाही मूळ शहरात परत पाठवण्यात आले.
शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास सुखोई विमान रन-वे क्रमांक १० वर लँडिंग करत होते. यावेळी वैमानिकाकडून 'हार्ड लँडिंग' झाले. जमिनीवर आदळल्यामुळे विमानाचे टायर आणि धावपट्टी यांच्यात प्रचंड घर्षण झाले. त्यातून ठिणग्या उडून विमानाच्या मागील भागाला आग लागली. धावपट्टीवर तैनात असलेल्या अग्निशामक दलाच्या गाड्यांनी तात्काळ बचावकार्य सुरु केले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझवली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विमानाचे आणि धावपट्टीचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातग्रस्त विमान धावपट्टीच्या मधोमध अडकून पडल्याने धावपट्टी तात्पुरती बंद करण्यात आली आहे. किमान ५० प्रवासी विमानांना या अपघाताचा फटका बसला आहे.
पुण्याहून बाहेर जाणाऱ्या सर्व विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. इतर शहरांतून पुण्याच्या दिशेने येणारी विमाने हवेतच फिरत होती. सुरक्षिततेचा विचार करुन त्यांना पुन्हा मूळ शहरात परत पाठवण्यात आले. अचानक विमानसेवा ठप्प झाल्याने विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे ५:४५ च्या सुमारास विमान धावपट्टीवरून हटवण्यात आले.