पोलिसांना मिळाले प्रभावी संवाद कौशल्याचे धडे, सॉफ्ट स्किल्स अॅण्ड पब्लिक स्पिंकींग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
पोलिसांना मिळाले प्रभावी संवाद कौशल्याचे धडे, सॉफ्ट स्किल्स अॅण्ड पब्लिक स्पिंकींग प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन
पिंपरी, ता. १० - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांच्यासाठी ७ व ८ एप्रिलला सॉफ्ट स्किल्स अॅण्ड पब्लिक स्पिंकींग प्रशिक्षण कार्यशाळा पार पडले. नागरीकांशी प्रभावीपणे संवाद साधण्याचे धडे पोलिसांना या कार्यशाळेतून मिळाले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील एकूण ५१ अधिकारी व १६८ अंमलदार या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.
सदर कार्यशाळा पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून पोलिस आयुक्तालयात आयोजित केली होती. पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा नागरिकांशी होणारा संवाद अधिक उत्तम व्हावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शहरातील सर्व पोलीस ठाणी, नियंत्रण कक्ष, (डायल ११२), दामिनी पथक, वाहतूक शाखा, जेष्ठ नागरिक कक्ष, महिला सहायक कक्ष या विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार कार्यशाळेत सहभागी झाले.
आरभी क्रिएशनच्या सानिका कुलकर्णी यांनी अधिकारी व अंमलदार यांना प्रभावी संवादकौशल्य आत्मसात करण्याविषयी मार्गदर्शन केले. पोलिसांसमोर येणाऱ्या प्रत्येक घटनेला संयमाने हाताळण्यासाठी नागरीकांशी व्यवस्थित, नेमका संवाद साधण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेतून मिळाले. पोलिसांना उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.