प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्कमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामावरुन लोकप्रतिनिधींमध्ये वादंग ......... स्थानिक नगरसेवकांचे महापौर रवी लांडगे यांना निवेदन
प्रभाग क्रमांक ११ मधील जॉगर्स पार्कमध्ये सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामावरुन लोकप्रतिनिधींमध्ये वादंग
स्थानिक नगरसेवकांचे महापौर रवी लांडगे यांना निवेदन
पिंपरी, ता. १८ - प्रभाग क्रमांक ११ मध्ये जॉगर्स पार्क उद्यानात माजी महापौर मंगला कदम यांच्या पुढाकारातून अनिधकृत बांधकाम सुरु आहे. याला स्थानिक नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी विरोध केला आहे. त्या विरोधावरुन रविवारी (ता. १७) मंगला कदम यांनी थेट महेश लांडगे यांना रस्त्यात गाठूनच बडबड केली. त्यानंतर, सोशल मिडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि प्रभाग क्रमांक ११ मधील चारही नगरसेवकांनी महापौरांची भेट घेतली. आता या गोष्टीवरुन शहरात वादंग सुरु आहे. या महापालिका प्रशासन याबाबत काय भूमिका घेणार याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.

रविवारी (ता. १७) आमदार महेश लांडगे प्रभाग क्रमांक ११ परिसरात एका कार्यक्रमासाठी आले होते. ते तेथून परतत असताना मंगला कदम यांनी योगिता नागरगोजे यांच्याविरोधात घोषणा देत अचानक आमदार लांडगे यांना थांबवले आणि मोठ्या आवाजात बडबड केली. त्या म्हणाल्या, ''आम्ही गेली १५ वर्षे तुमचे काम करत आहोत. हे नागरीक तुम्हाला मतदान करतात. मी विलास लांडे यांना पाडण्यासाठी १५ वर्षे तुमचे काम करतेय. तुम्हाला विचारुन, सांगून, तुमच्या साक्षाने हे काम सुरु केले आणि आता नागरगोजे बाई हे बांधकाम पाडायला सांगत आहेत. '' यावेळी प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेवक नीलेश नेवाळे व मंगला कदम यांच्यातही वाद झाला.
याबाबत, 'पीसीएमसी न्यूज'च्या प्रतिनिधींनी या प्रकरणाची वस्तुस्थिती जाणून घेतली. प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका योगिता नागरगोजे म्हणाल्या, ''जॉगर्स पार्कमध्ये माजी महापौर मंगला कदम व नगरसेवक कुशाग्र कदम यांच्या पुढाकाराने अनधिकृत बांधकाम सुरु आहे. गेले पाच महिने हे काम सुरु आहे. जॉगर्स पार्कमध्ये दररोज सकाळी व सायंकाळी नागरीक व्यायामासाठी येतात. पोलिस भरतीसाठी तयारी करणारे तरुण इथे व्यायामासाठी येतात. इथे जैवविविधता आहे. आम्ही याबाबत अतिक्रमण विभागाला व उद्यान विभागाला पत्र दिले ते एकमेकांवर जबाबदारी ढकलतात. आता आम्ही महापौर रवी लांडगे यांना निवेदन दिले आहे. मंगला कदम यांनी दुसऱ्या प्रभागात हस्तक्षेप करु नये. ''