आंतराष्ट्रीय योगा स्पर्धेत चिंचवडच्या प्रणित आढाव याला दुहेरी सुवर्णपदक
पिंपरी, ता. २७ - हाँगकाँग येथे आयोजित करण्यात आलेल्या इंटरनॅशनल योगा स्पर्धेत चिंचवड येथील युवक प्रणित गणेश आढाव याने दुहेरी सुवर्णपदक पटकावले आहे.
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. या उल्लेखनीय यशाबद्दल प्रणितचा सन्मान महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौरांनी प्रणितला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रणितने ट्रॅडिशनल योगा व आर्टिस्टिक योगा या दोन्ही प्रकारांमध्ये दुहेरी सुवर्णपदक पटकावले आहे. ११ देशांतील खेळाडूंमध्ये त्याने ही उल्लेखनीय कामगिरी करुन पिंपरी चिंचवड शहरासह देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. या यशासाठी त्याला योगशिक्षिका वर्षा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.