नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकडून करदात्यांसाठी विशेष सवलती जाहीर
नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकडून करदात्यांसाठी विशेष सवलती जाहीर
पिंपरी, ता. १७ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत वर्ष २०२६-२७ या नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त मालमत्ताधारकांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. दिनांक १ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात आलेल्या या सवलत योजनेंतर्गत नागरिकांना एकूण १६ प्रकारच्या सवलतींचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. महानगरपालिकेने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरावा. वेळेवर कर भरणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची भूमिका असून, त्यातूनच शहराच्या सर्वांगीण विकासाला बळ मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले आहे.
महापालिकेच्या या उपक्रमांतर्गत चालू वर्षाच्या सामान्य करावर ५ टक्के सवलत देण्यात आली आहे. याशिवाय, ऑनलाइन माध्यमातून मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना अतिरिक्त ५ टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही सवलत देण्यात येत असून, नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करून कर भरण्यास प्राधान्य द्यावे. सवलत योजना दिनांक ३० जून २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, उद्याने, शैक्षणिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने कामे सुरू असून, या सर्व कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी कर संकलन हा अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. नागरिकांनी वेळेवर कर भरणा केल्यास शहराच्या विकासकामांना गती मिळून नागरिकांना अधिक दर्जेदार सेवा देणे शक्य होते.
कर भरण्याची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी महानगरपालिकेने ऑनलाइन कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यामुळे नागरिकांना घरबसल्या कर भरणा करता येत असून, वेळेची बचत होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या असून, या सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी नागरिकांनी ३० जूनपूर्वी कर भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- प्रमुख सवलती अशा......
- ३० जून अखेर मालमत्ता कराची रक्कम भरल्यास ५ टक्के सामान्य करात सूट
- ऑनलाइन स्वरूपात कराचा भरणा केल्यास ५ टक्के सामान्य करात सूट
- फक्त महिलांच्या नावे असलेल्या एका निवासी मालमत्तेच्या सामान्य करावर तब्बल ३० टक्के सामान्य करात सूट
- दिव्यांग व्यक्तीच्या एका मालमत्तेच्या सामान्य करावर ५० टक्के सामान्य करात सूट
- स्वातंत्र्यसैनिक किंवा त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेवर ५० टक्के सामान्य करात सूट
- ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा कार्यान्वित असल्यास ५ टक्के सामान्य करात सूट
- 'एसटीपी प्लँट' कार्यान्वित असल्यास ३ टक्के सामान्य करात सूट
- ऑनसाइट कंपोस्टिंग यंत्रणा आणि 'एसटीपी प्लँट' कार्यान्वित असल्यास ८ टक्के सामान्य करात सूट
- झिरो वेस्ट संकल्पना राबविल्यास ८ टक्के सामान्य करात सूट
- झिरो वेस्ट आणि 'एसटीपी प्लँट' कार्यान्वित असल्यास १० टक्के सामान्य करात सूट
- शैक्षणिक इमारतींना ऑनसाइट कंपोस्टिंग ४%, झिरो वेस्ट ४ %, झिरोवेस्ट व रेनवॉटर हार्वेस्टिंग ८%,
झिरोवेस्ट व सौर उर्जा ९%, झिरोवेस्ट,रेनवॉटर हार्वेस्टिंग व सौर उर्जा १० ८%
सवलतींचा लाभ घ्यावा आणि वेळेत कर भरावा....
''पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित कर संकलन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि इतर नागरी सुविधा सक्षमपणे पुरवण्यासाठी करदात्यांचे योगदान मोलाचे ठरते. नागरिकांनी ऑनलाइन माध्यमाचा अवलंब करून कर भरण्याची सुलभ, पारदर्शक आणि वेगवान प्रक्रिया अनुभवावी. तसेच महानगरपालिकेने जाहीर केलेल्या सवलतींचा लाभ घ्यावा आणि वेळेत कर भरुन शहराच्या विकासात आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.''
- महापौर रवी लांडगे
निश्चित कालावधीत कर भरावा....
''करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी यंदा विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी निश्चित कालावधीत कर भरणा करणे आवश्यक आहे. वेळेत कर भरल्यामुळे आर्थिक सवलत मिळण्यासोबतच शहरातील सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी पुढाकार घेऊन सवलतींचा लाभ घ्यावा.''
- सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका