ट्रकचा धक्का लागू दुचाकी कोसळली, दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृत्यू, पुनावळे येथील अपघात
पिंपरी, ता. १ - मालवाहू ट्रकचा धावत्या दुचाकीस धक्का लागून दुचाकीवरील दोघे तरुण खाली पडले व त्यातील एकाचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (ता. ३१) रात्री पुनावळे येथील अॅडमव्हिले सोसायटी समोरील रस्त्यावर घडली आहे.
याबाबत, कृष्णा घनश्याम शर्मा (वय १८ वर्षे, शिक्षण, रा. समर्थ कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) याने तक्रार दिली आहे. अनोळखी ट्रकचालकाविरोधात रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (ता. ३१) फिर्यादी कृष्णा व त्याचा मित्र ओमकार शिखरे अॅक्टीव्हा दुचाकीवरुन जेएसपीएम कॉलेज मॅकडोनाल्ड येथून हिंजवडीकडे जात होते. पुनावळे येथे अॅडमव्हिले सोसायटीसमोरील रस्त्यावर एका टाटा कंपनीच्य मालवाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला उजव्या बाजूने ओव्हरटेक केले. त्यावेळी ट्रकचा दुचाकीस धक्का लागल्याने कृष्णा व ओमकार दोघेही गाडीवरुन खाली पडले. ओमकार शिखरे यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरोधात रावेत पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १०६ (१) मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपी मूळचा उत्तरप्रदेशातील आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.