पुण्यातील निर्जन परिसरात बसवलेत सहाशेहून अधिक एआय सीसीटिव्ही कॅमेरे
Apr 07 2026
90
पुण्यातील निर्जन परिसरात बसवलेत सहाशेहून अधिक एआय सीसीटिव्ही कॅमेरे
पुणे, ता. ७ - पुणे शहर पोलीस व महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राबवलेल्या 'पुणे सीसीटीव्ही सर्व्हेलन्स व सुरक्षित शहर' योजनेमध्ये शहरात १७८ ठिकाणी सहाशेहून अधिक उच्च दर्जाचे (एआय) सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पुणे शहर व परिसरातील निर्जन भाग, टेकड्या, घाट, उद्याने, नदीकाठ अशा ठिकाणी हे कॅमेरे बसवले आहेत. यामुळे गैरप्रकारांना प्रतिबंध बसणार आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचाराची घटना घडली होती. या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एआय आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कॅमेरे बसवण्याचे काम सुरु झाले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली कॅमेरे बसवले जात आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक पवार (दळणवळण व माहिती तंत्रज्ञान) हे समन्वयाची जबाबदारी पार पाडत आहेत.
बोपदेव घाट, वेताळ, सुतारदरा, पर्वती, तळजाई, रामटेकडी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, जोगेश्वरी मंदिर, जुना बोगदा घाट, एनआयबीएम वन क्षेत्र, पाषाण तलाव खडकवासला धरण यासह निर्जन स्थळी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.
गुन्हेगारी निश्चितपणे कमी होईल.....
''सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या सतत निगराणीमुळे गुन्हेगारी निश्चितपणे कमी होईल. आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद मिळण्यास वेळ कमी लागेल. महिलांमध्ये सुरक्षित वाटले. उच्च दर्जाच्या कॅमेऱ्यांमुळे स्पष्ट पुरावे उपलब्ध होतील. '' - अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे