पुण्यातील २ हजार आशा सेविका गेले ५ महिने राबताहेत मानधनाविना
आशा सेविकांच्या मानधनाची रक्कम लवकर मिळावी, यासाठी राज्यशासनाकडे पाठपुरावा सुरु, प्रशासनाची माहिती
पिंपरी, ता. ७ - पुणे महापालिकेत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन हजार आशा सेविका गेले पाच महिने मानधनाविना राबत आहेत. महापालिका त्यांच्याकडून दररोज १२ तास काम करुन घेत आहे मात्र, शासनाकडून निधी न आल्याने आम्ही मानधन देऊ शकणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले असल्याने आशा सेविकांमध्ये तीव्र नाराजी अन् संतापाची भावना आहे.
शहरांमध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आशा सेविकांचे योगदान मोठे असते. त्या घराघरात जाऊन नागरिकांच्या आरोग्याची माहिती घेतात, गर्भवती महिलांची नोंदणी करतात, नवजात बालक आणि मातांची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करतात, लसीकरणाविषयी जनजागृती करतात, विविध साथीच्या आजारांबाबत नागरीकांना घरोघरी जाऊन माहिती देतात. पुणे महापालिका त्यांच्याकडून १२ तास काम करुन घेत आहे. मात्र, त्यांच्या मानधनाविषयी थोडीही फिकीर करत नसल्याचे चित्र आहे.
शहराच्या आरोग्याबाबत आम्ही एवढे महत्त्वाचे काम करुनही गेल्या पाच महिन्यांपासून मानधन मिळाले नाही याची मोठी खंत आशासेविकांनी मांडली. महापालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र ठोस तोडगा अजूनही निघालेला नाही. आम्ही सकाळी सात ते सायंकाळी सात असे जवळपास १२ तास काम करत आहोत. दररोज किमान ५० घरांना भेटी द्यायच्या असतात. आम्हाला दर महिन्याला ९ हजार ५०० रुपये मानधन मिळते. हे मानधन अपुरे आहे त्यात वाढ केली पाहिजे अशी मागणीही आशा सेविकांनी केली आहे.
रक्कम मिळताच मानधन दिले जाईल....
याबाबत, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या की, ''आशासेविकांचे मानधन महापालिका देत नाही. ते राज्य शासनाकडून दिले जाते. आशा सेविकांच्या मानधनाची रक्कम महापालिकेला अजून मिळालेली नाही. ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. रक्कम मिळताच मानधन दिले जाईल.''