पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६, प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामकाजाचा आढावा
May 27 2026
22
पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६, प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कामकाजाचा आढावा
पुणे, ता. २७ - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर निवडणूकीच्या कामकाजाच्या अनुषंगाने निवडणूकीच्या विविध टप्प्यांवर जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. प्रत्येक नोडल अधिकाऱ्यानी समन्वय ठेवून दिलेल्या जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथून सर्व नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकाऱ्यांच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, उप जिल्हाधिकारी नामेदव टिळेकर निवडणूक तहसीलदार शीतल मुळे-भामरे तसेच सर्व सबंधित नोडल अधिकारी व सहायक नोडल अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पाटील यांनी अधिकारी व कर्मचारी नियुक्ती आणि मतपत्रिका छपाई व वाटप, मतदान पेटी व्यवस्थापन व निवडणूक साहित्य आणि स्टेशनरी व्यवस्थापन, वाहन अधिग्रहण, वाहन व्यवस्थापन व वाहतूक आराखडा, संगणकीकरण व्यवस्थापन व मतमोजणी नमुने तयार करणे, कायदा व सुव्यवस्था व पोलीस डिप्लॉमेंट आराखडा तसेच आदर्श आचारसंहिता व्यवस्थापन, निवडणूक खर्च व्यवस्थापन, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, मतदार यादी व मतदान केंद्र व्यवस्थापन, मतमोजणी आराखडा व स्ट्रॉंग रुम व्यवस्थापन आणि निवडणूक विषयक दस्ताऐवज जतन करणे आणि विहीत पद्धतीने विल्हेवाट लावणे आदीबाबत कामकाजाबाबत संबंधितांकडून आढावा घेण्यात आला.