सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करा, पुणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करा, पुणे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना
पुणे, ता. २१ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणे महापालिकेने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वे, मेट्रो, पीएमपीएमएल बस, राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा वापर करावा तसेत स्थळ भेटीच्या वेळी कार पुलिंगला प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले आहेत.
महापौर मंजुषा नागपुरे यांनीही महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नगरसेवकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांनी बुधवारी (ता. २०) प्रशासनाला वाहनांच्या वापराबाबतचे निर्देश दिले. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करावा, आठवड्यातील किमान एक दिवस मेट्रो, लोकल, रेल्वे, पीएमपीएमएल बस यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. अधिकाऱ्यांनी क्षेत्र भेटीसाठी जाताना कार पुलिंगचा वापर करण्यास प्राधान्य देऊन वाहनांचा वापर कमी करावा, मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच इतर ठिकाणी कार्यालयीन कामासाठी प्रवास करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एसटी बस आणि रेल्वेचा वापर करावा. बैठक, प्रशिक्षण किंवा चर्चासत्र प्रत्यक्ष आयोजित करण्याऐवजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर भर द्यावा, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त नायर यांनी दिल्या आहेत.
याबाबत बोलताना पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा काटकसरीने वापर करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर करावा. वाहनांचा अनावश्यक वापर टाळावा, याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत."