महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचे शनिवारी भूमिपूजन

पिंपरी, ता. १६ जुलै २०२६ -  महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुणे–शिरूर द्रुतगती महामार्ग, हडपसर–यवत उन्नत मार्ग आणि तळेगाव–चाकण–शिक्रापूर उन्नत महामार्ग या तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बुधवारी (ता. १५) घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित यंत्रणा व स्थानिक लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या तीनही प्रकल्पांचे भूमिपूजन शनिवार, दिनांक १८ जुलैला दुपारी १.३० वाजता गणेश कला क्रीडा मंच, पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

बैठकीस कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सर्वश्री राहुल कुल, सुनील कांबळे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर कटके, योगेश टिळेकर, चेतन तुपे, बापूसाहेब पठारे, हेमंत रासने, सुनील शेळके, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभाग नोंदविला.

यावेळी मंत्री भोसले म्हणाले, ''पुणे परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हे तीन प्रकल्प हाती घेण्यात आले असून, त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हडपसर–यवत रस्ते प्रकल्प महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि मेट्रो प्रशासनाच्या समन्वयातून राबविण्यात येणार असून, वाहतूक व्यवस्थापनाबाबत पुणे महानगरपालिका व वाहतूक पोलिसांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. सर्व प्रकल्पांची कामे चार वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.'' कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचना व अपेक्षांचा योग्य विचार केला जाईल, असे सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची सूचना केली, तर खासदार अमोल कोल्हे यांनी पुणे–शिरूर रस्ते प्रकल्पासाठी सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. बैठकीत महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे मुख्य अभियंता रणजीत हांडे यांनी सादरीकरणाद्वारे तीनही प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories