पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे, ता. ८ - पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आतापर्यंत १ हजार ८३७ एकर जागेची संमतीपत्र शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केली आहेत. विमानतळासाठी भूसंपादन करावयाच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास ६० टक्क्यांहून अधिक जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. आतापर्यंत ९०० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
विमानतळासाठी ७ मे पासून भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. सुमारे ३ हजार एकर जागेचे संपादन करण्यात येणार आहे. त्यामुळे विमानतळासाठी आवश्यक असलेले क्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक क्षेत्र संपादित झाले आहे. जमीन मोजणीवेळी सुमारे ९६ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने प्रति एकर एक कोटी ६१ लाख रुपये मोबदल्याची रक्कम निश्चित केली आहे. भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सुमारे ६ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यासाठी 'एमआयडीसी'ने HUDCO - Housing and Urban Development Corporation कडून कर्ज घेतले आहे. त्याचा पहिला पाचशे कोटी रुपयांचा हप्ता जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता. भूसंपादन प्रत्यक्षात सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत सुमारे ९०० कोटी रुपयांच्या मोबदल्याचे वाटप शेतकऱ्यांना झाले आहे.
शेतकऱ्यांमध्ये जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेबाबत वाद आहेत. त्या शेतकऱ्यांची प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यात जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे ही प्रकरणे न्यायालयात न जाता परस्पर संमतीने सोडवण्यावर भर दिला जात आहे. मोबदल्याचे वाटप करताना रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद वाढत चालला आहे, असे डुडी यांनी सांगितले.