बांधकाम साईटवर परवानगीशिवाय करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे कामगार गंभीर जखमी
May 27 2026
24
बांधकाम साईटवर परवानगीशिवाय करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे कामगार गंभीर जखमी
पिंपरी, ता. २७ - रावेत येथील मुकाई चौक ते भक्ती शक्ती चौक नव्या बीआरटी रोडजवळील बांधकाम साईटवर परवानगीशिवाय करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात दोन कंत्राटदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २६ मे रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता घडली असून, याप्रकरणी दशरथ बबन सदगीर (पोलीस शिपाई, रावेत पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आस्टोरिया बांधकाम साईट येथे कोणतीही रीतसर परवानगी न घेता तसेच प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करुन कंट्रोल ब्लास्टिंग करण्यात आले. ब्लास्टिंगनंतर सुरक्षेची योग्य तपासणी न करता पुन्हा त्याच छिद्रात ड्रिलिंगचे काम सुरु ठेवण्यात आले. याचवेळी झालेल्या स्फोटात कामगार बबलू शेख (वय ३५) हे गंभीर जखमी झाले.
या प्रकरणात शशिकांत राघवशरण श्रीवास्तव (वय अंदाजे ५५, रा. ताथवडे) आणि सचिन शंकर चव्हाण (वय अंदाजे २३, रा. कुरूळी) या दोन कंत्राटदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांनुसार तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.