प्रेषित हजरत मुहम्मद व माता आयेशा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; नाजिया इलाही खान विरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार
प्रेषित हजरत मुहम्मद व माता आयेशा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; नाजिया इलाही खान विरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार
काँग्रेस अल्पसंख्याक विभागाची कठोर कारवाईची मागणी; गुन्हा दाखल न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा
पिंपरी, ता. २७ - प्रेषित हजरत मुहम्मद (स.) आणि माता आयेशा (रजि.) यांच्याबाबत कथितरित्या आक्षेपार्ह व अश्लील वक्तव्य करून मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नाजिया इलाही खान हिच्याविरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष शाहाबुद्दीन एम. शेख यांनी ही तक्रार दिली आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, जगभरातील कोट्यवधी मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रेषित हजरत मुहम्मद (स.) आणि माता आयेशा (रजि.) यांच्याविषयी नाजिया इलाही खान हिने अत्यंत अश्लील, आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केले. या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या असून देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
शाहाबुद्दीन शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिला विविध वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सातत्याने मुस्लिम समाजाबाबत द्वेषयुक्त, प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधाने करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. धार्मिक श्रद्धास्थानांचा सार्वजनिकरित्या अवमान करणे हे संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या भावनेला धक्का देणारे असून अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाने मांडली आहे.
याबाबत बोलताना शाहाबुद्दीन शेख म्हणाले, "पिंपरी चिंचवड शहरात सर्वधर्मीयांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा ही आमची भूमिका आहे. कोणत्याही धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्यामुळे नाजिया इलाही खान हिच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी." दरम्यान, पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही तक्रारदारांनी प्रशासनाला दिला आहे.
या तक्रारीस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अक्रम शेख, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष शाहाबुद्दीन एम. शेख, उपाध्यक्ष व्ही. एम. कबीर, विजय ओव्हाळ, रोहित भाट, भोसरी ब्लॉक अध्यक्ष रिजवान खान तसेच सिद्धार्थ वानखडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले. निगडी पोलिसांकडून या तक्रारीची पडताळणी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.