पिंपळे सौदागर येथील लहानगा ऋग्वेद शेवाळे पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण
Apr 13 2026
45
पिंपळे सौदागर येथील लहानगा ऋग्वेद शेवाळे पहिल्याच प्रयत्नात अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा उत्तीर्ण
पिंपरी, ता. १३ - पिंपळे सौदागर येथील ऋग्वेद शशिकांत शेवाळे या लहानग्या विद्यार्थ्याने अत्यंत कठीण समजली जाणारी ‘सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत’ पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे. ऋग्वेदची तामिळनाडू-अमरावतीनगर येथील सैनिक शाळेत शिक्षणासाठी निवड झाली आहे. या महत्त्वाच्या यशाबद्दल ऋग्वेदचे पिंपळे सौदागर परिसरात कौतुक होत आहे. नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे यांनी ऋग्वेदला सन्मानचिन्ह त्याचा गौरव केला आहे.
अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) 'नॅशनल टेस्टिंग एजन्सी' (National Testing Agency)द्वारे इयत्ता ६ वी आणि ९ वी मध्ये घेतली जाते. राष्ट्रीय स्तरावरील ही परीक्षा जानेवारीत Optical Mark Recognition - OMR पद्धतीने होते. त्यानंतर वैद्यकीय चाचणीही असते. देशभरातून जवळपास २ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ऋग्वेदने लेखी परीक्षा व वैद्यकीय चाचणीचाही टप्पा पार केला. ऋग्वेदची जवाहर नवोदय विद्यालय आणि राष्ट्रीय मिलिटरी स्कूल या दोन्ही प्रतिष्ठित शाळांसाठी निवड झाली आहे.
“आजच्या पिढीतील मुलांनी देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून अशा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवणे, ही संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऋग्वेदने केवळ शेवाळे परिवाराचेच नव्हे, आपल्या परिसराचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवले आहे. त्याच्या या यशात त्याच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मोठे योगदान आहे. भविष्यात ऋग्वेद एक उत्तम लष्करी अधिकारी बनून देशाची सेवा करेल, असा मला विश्वास आहे.” अशा शब्दांत शत्रुघ्न काटे यांनी ऋग्वेदला शुभेच्छा दिल्या.