शहरातील जनगणनेसाठी पर्यवेक्षक व प्रगणकांना महापालिकेकडून विशेष प्रशिक्षण पूर्ण
पिंपरी, ता. १३ - देशात सन २०२७ ची जनगणना १६ एप्रिल २०२६ पासून सुरु होणार आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत होणार आहे. त्यानुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही पर्यवेक्षक व प्रगणकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष प्रशिक्षण ६ एप्रिल ते ११ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडले.
शहरातील विविध प्रशिक्षण केंद्रांवर ही मार्गदर्शन सत्रे पार पडली. या प्रशिक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले मास्टर ट्रेनर उपायुक्त पंकज पाटील, उपायुक्त अण्णा बोदडे, नायब तहसीलदार स्वाती नरुटे यांनी पर्यवेक्षक व प्रगणकांना मार्गदर्शन केले. जनगणना प्रक्रियेची उद्दिष्टे, घरगुती सर्वेक्षण करण्याची अचूक पद्धत, माहिती संकलन करताना घ्यावयाची काळजी, तसेच नागरिकांशी प्रभावी संवाद साधण्याचे तंत्र, डिजिटल साधनांचा वापर करून माहिती नोंदविण्याची पद्धत, ॲप आधारित डेटा एन्ट्री, माहितीची पडताळणी आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक बाबी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात प्रत्यक्ष सराव सत्रांवर विशेष भर देण्यात आला.
या प्रशिक्षणाद्वारे पर्यवेक्षक व प्रगणक अधिक आत्मविश्वासाने व सक्षमपणे काम करण्यास सज्ज झाले आहेत. आगामी जनगणना प्रक्रियेत अचूक, विश्वासार्ह आणि वेळेत माहिती संकलित करण्यासाठी हे प्रशिक्षित मनुष्यबळ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेली अचूक लोकसंख्यात्मक माहिती उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे, असे प्रशासाने सांगितले.
पहिल्या टप्प्यानंतर प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया
''शहरात जनगणना प्रक्रियेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत राबवण्यात येणार असून, या टप्प्यात घरगुती सर्वेक्षणाद्वारे शहरातील प्रत्येक कुटुंबाची सविस्तर माहिती संकलित केली जाणार आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांची संख्या, वय, शिक्षण, व्यवसाय, निवासस्थिती तसेच इतर आवश्यक सामाजिक व आर्थिक बाबींचा समावेश असेल. या सर्वेक्षणामुळे शहराची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक रचना समजून घेण्यास मदत होईल. पहिल्या टप्प्यानंतर प्रत्यक्ष जनगणना प्रक्रिया सुरू केली जाईल, ज्यामध्ये संकलित माहितीची पडताळणी आणि अंतिम नोंदणी केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि अचूक पद्धतीने पार पाडण्यावर महापालिकेचा भर आहे.''
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
प्रशिक्षित मनुष्यबळामुळे जनगणना प्रक्रिया पारदर्शक होईल...
'' प्रशिक्षित मनुष्यबळामुळे जनगणना प्रक्रिया अधिक पारदर्शक, परिणामकारक आणि विश्वासार्ह होणार आहे. या प्रशिक्षणामुळे प्रत्यक्ष क्षेत्रात काम करताना आवश्यक कौशल्ये, तांत्रिक ज्ञान आणि आत्मविश्वास मिळेल. डिजिटल साधनांचा योग्य वापर, नागरिकांशी प्रभावी संवाद आणि माहिती संकलनातील अचूकता यामुळे संपूर्ण जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ आणि गतिमान होईल. भविष्यातील शहर नियोजनासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.''
– सचिन पवार, उप आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका