आरटीई प्रवेशाची दुसरी फेरी सुरु, २३ मे पर्यंत प्रवेश घेता येणार
पिंपरी, ता. १८ - पिंपरी-चिंचवडमध्ये आरटीई (RTE)अंतर्गत पहिल्या फेरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी आणि प्रवेश निश्चिती पूर्ण झाली आहे. प्रवेश प्रक्रियेतील दुसऱ्या फेरीला शुक्रवार (ता. १५) पासून सुरुवात झाली असून, विद्यार्थ्यांना २३ मेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.
पिंपरी आणि आकुर्डी येथील उन्नत शहर साधन केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या केंद्रावर कागदपत्र पडताळणीची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत आहे. पहिल्या फेरीमध्ये, पिंपरी केंद्रात ६४ शाळांमधील १ हजार ३०२ जागांसाठी प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यापैकी १ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून, ५७ अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे अद्याप २४५ जागा रिक्त आहेत. आकुर्डी केंद्रात ११५ शाळांमध्ये २ हजार ६२९ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी २ हजार ७४ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले असून, ३८ अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे ५१७ जागा अद्याप रिक्त आहेत. पिंपरी आणि आकुर्डी केंद्रात मिळून ७६२ जागा शिल्लक आहेत.
पालकांनी अर्जाची स्थिती आणि अलॉटमेंट लेटर थेट RTE 25% Admission Portal वर जाऊन स्वतः तपासावे तसेच प्रवेशाच्या वेळी मूळ कागदपत्रे आणि त्यांची साक्षांकित प्रत सोबत नेणे बंधनकारक आहे. पालकांनी सर्व कागदपत्रे वेळेवर सादर करुन आपल्या पाल्याचा शाळा प्रवेश निश्चित करावा. आरटीई प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि संगणकीकृत आहे. यासाठी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.