सद्गुरुनगर-भोसरी येथे जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा, ४ लाखांचे साहित्य जप्त
पिंपरी, ता. १७ - सद्गुरुनगर-भोसरी येथे गुरुवारी (ता. १६) सायंकाळी पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून ४ लाख १६ हजार ८९० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. यात सहा जणांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, पोलिस शिपाई ज्ञानेश्वर लक्ष्मण साळवे यांनी फिर्याद नोंदवली आहे. आरोपी राजाभाऊ गोविंद पालकर (वय ५१ वर्षे, व्यवसाय, रा. भोसरी), सुभाष थावरु राठोड (वय ३९ वर्षे, सिव्हील इंजिनिअर, रा. भोसरी), अभय बाजीराव ओव्हाळ (वय ३८ वर्षे, व्यवसाय, रा. भोसरी), अकबर मुनीर शेख (वय ५२ वर्षे, मिस्त्री, रा. भोसरी),रामदास पोपट गायकवाड (वय ४२ वर्षे, ड्रायव्हर, रा. भोसरी) व देवा मानु राठोड (वय ३६ वर्षे, व्यवसाय, रा. भोसरी) सद्गुरुनगर-भोसरी येथे मोकळ्या जागेत तीन पत्ती जुगार खेळत होते.
त्यांच्याकडून एकुण ४ लाख १६ हजार ८९० रुपयांचे जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. भोसरी पोलिस ठाण्यात गुरुवारी आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.