देहूरोड | 10 सप्टेंबर 2026 : भारतीय लष्कराच्या प्रतिबंधित क्षेत्रातील तारेचे कुंपण कापून आत प्रवेश करत चंदनाच्या झाडाचा गाभा असलेले खोड चोरून नेल्याची घटना देहूरोड येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे.
मोनिश्वर पोहेश्वर सोनुवाल (वय 42, नाईक सुभेदार, 126 Light AD Regiment) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 9 सप्टेंबर रोजी पहाटे 1:14 वाजण्याच्या सुमारास Garden City परिसरातील 126 Light AD Regiment Centre, Dehu Camp येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लष्करी परिसराभोवती असलेले तारेचे कुंपण कशाच्या तरी साहाय्याने कापले. कुंपणाचे नुकसान करून त्यांनी प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रवेश केला. त्यानंतर परिसरातील चंदनाचे झाड तोडून त्याचा गाभा असलेले खोड चोरून नेल्याचा आरोप आहे.
चोरीला गेलेल्या चंदनाच्या खोडाची किंमत अंदाजे 10 हजार रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि संगनमताने ही चोरी केल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी रविंद्र बुवाजी मधे (वय 26, रा. पिंपळगाव माथा, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे. अविनाश मधे (वय अंदाजे 25, रा. वांगदरी, ब्राह्मणवाडा, जिल्हा अहिल्यानगर) आणि गोविंद कडाळे (वय अंदाजे 30, रा. आंबेगव्हाण, ओतूर, जुन्नर) हे दोघे पाहिजे आरोपी असल्याचे नोंदीत म्हटले आहे.
याप्रकरणी 9 सप्टेंबर रोजी दुपारी 2:28 वाजता देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 301/2026 दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2), 329(3), 324(3) आणि 3(5) अंतर्गत पुढील तपास सुरू आहे.