कर्जाच्या आमिषाने मिळवली 60 ते 70 बँक खाती; सायबर फसवणुकीचे कोट्यवधी स्वीकारणारे दोघे अटकेत

कर्जाच्या आमिषाने मिळवली 60 ते 70 बँक खाती; सायबर फसवणुकीचे कोट्यवधी स्वीकारणारे दोघे अटकेत

पिंपरी-चिंचवड | 10 सप्टेंबर 2026 : नागरिकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या नावावरील बँक खाती मिळवायची आणि त्यांचा वापर सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम स्वीकारण्यासाठी करायचा, अशा म्युल खात्यांच्या नेटवर्कचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात गोवा आणि कोलकाता येथील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील फिर्यादी एका खासगी कंपनीमध्ये व्यवस्थापक आहेत. आरोपींनी विदेशी शेअर बाजार, स्टॉक मार्केट आणि आयपीओमध्ये गुंतवणूक केल्यास 500 टक्के नफा मिळेल, असे आमिष त्यांना दाखवले. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास सांगून फिर्यादीची एकूण 83 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे.

याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 37/2026 नोंदवण्यात आला. आर्थिक व्यवहार आणि तांत्रिक माहितीची तपासणी करताना 21 मार्च 2026 रोजी फिर्यादीकडून पाठवण्यात आलेली 30 लाख रुपयांची रक्कम सेंट्रल बँक ऑफ इंडियामधील एका खात्यात जमा झाल्याचे आढळले.

संबंधित खाते ‘शिवशक्ती एंटरप्रायझेस’च्या नावाने असून, ते अभिकेष मोहन आचरेकर आणि प्रतीक्षा नाईक यांच्या भागीदारीत असल्याचे तपासात समोर आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अभिकेष पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खेड शिवापूर परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने कोलकाता येथील साथीदार अनमोल शर्मा याच्या मदतीने सायबर फसवणुकीतील रक्कम संबंधित खात्यात स्वीकारल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक कोलकाता येथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अनमोल शर्मा यालाही अटक करण्यात आली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी गोव्यातील सामान्य नागरिकांना, विशेषतः महिलांना कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून अंदाजे 60 ते 70 बँक खाती मिळवली होती. ही खाती पुढे सायबर फसवणुकीतील रक्कम स्वीकारण्यासाठी वापरली जात असल्याचा आरोप आहे. अशा खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचा संशय असून, त्याबाबत पुढील आर्थिक आणि तांत्रिक तपास सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अभिकेष मोहन आचरेकर (वय 34, रा. गोवा) आणि अनमोल शर्मा (वय 32, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी आहेत. आरोपी पुणे शहर आणि राजस्थानमधील इतर गुन्ह्यांमध्येही पोलिसांना हवे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. नागरिकांनी कर्ज किंवा अवास्तव गुंतवणूक परताव्याच्या आमिषाला बळी पडू नये तसेच आपले बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक आणि ऑनलाइन बँकिंगची माहिती कोणालाही वापरण्यास देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories