संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पोलिस आयुक्तांकडून पाहणी

पिंपरी, ता. ४ जुलै २०२६ -  संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा १९५ वा आषाढी वारी पालखी प्रस्थान सोहळा दिनांक ८ जुलै २०२६ रोजी पंढरपुराकडे प्रस्थान करणार आहे.  पालखी सोहळा शांततेने व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शुक्रवारी (ता. ३ जुलै) श्री क्षेत्र आळंदी येथील मंदीर परिसर व संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी केली.

श्री क्षेत्र आळंदी येथील मुख्य मंदीर व परिसर पाहणी दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या कार्यालयास भेट दिली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य केशवराव लोंढे (कबीरबुवा), विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतिनाथ, श्री. चैतन्य लोंढे व इतर यांचेशी चर्चा केली. यावेळी पालखी सोहळ्यादरम्यान येणाऱ्या अडचणींसंबंधी माहिती घेवून गर्दीचे व्यवस्थापन, कायदा व सुव्यवस्था दृष्टीने कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच आषाढी वारी व पालखी सोहळयात सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांना सुरक्षित व शांततेच्या मार्गाने संपूर्ण सोहळा भक्तीमय वातावरणात सर्वांचे सहकार्य व समन्वयाने पार पाडला जाईल याबाबत मा. पोलीस आयुक्त यांनी आश्वस्त केले.  पोलिस आयुक्तांनी नव्याने तयार करण्यात येणाऱ्या पालखी रथाची पाहणी केली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदीर व परिसरात दर्शनबारी दरम्यान होणाऱ्या गर्दीचे नियंत्रणासाठी रस्सी तसेच योग्यप्रकारे बॅरीकेटींगचा वापर करण्याबाबत सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

पोलिस आयुक्त चौबे यांनी पालखी मार्गावरील विसाव्याची ठिकाणे थोरल्या पादुका मंदीर व मॅग्झीन चौक, भोसरी फाटा येथे भेट देवून पाहणी केली. थोरल्या पादुका मंदीर येथे प्रवेशद्वार व दर्शनबारीच्या ठिकाणी योग्य प्रकारे बॅरीकेटींग करुन गर्दी नियंत्रणाच्या अनुषंगाने खबरदारी घेण्याबाबत सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. थोरल्या पादुका मंदीर परिसरातील बीआरटी मार्ग बंद ठेवून डेडीकेटेड एकल मार्ग सुरु ठेवून वाहतूक/रहदारीचा पालखी मार्गात अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत निर्देश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

 पालखी मार्गात अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांदया काढून टाकणे, पालखी मार्गावरील अडथळा ठरणारे कमानी काढून टाकणे याबाबत सूचना देण्यात आल्या. मॅग्झीन चौक, भोसरी फाटा येथे विसाव्याचे ठिकाणी पालखी रथाकरीता उभारण्यात आलेल्या मंडपाची पाहणी केली. तसेच सदर ठिकाणी कोणत्याही प्रकारे डी.जे. / डॉल्बी यांना परवानगी देण्यात येवू नये. जर विनापरवाना कोणी डी. जे. डॉल्बी लावलेच तर त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना दिले. सदर ठिकाणी केवळ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत उभारण्यात येणाऱ्या स्वागत मंडपामध्येच उ‌द्घोषणेकरीता स्पीकर चालू राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना संबंधितांना दिल्या.

पाहणीवेळी, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह डॉ. शशिकांत महावरकर (पोलिस सह आयुक्त), सारंग आवाड (अपर पोलिस आयुक्त, गुन्हे), बसवराज तेली (अपर पोलिस आयुक्त, प्रादेशिक विभाग), मारुती जगताप (पोलिस उप आयुक्त परिमंडळ - ३), रोहीदास पवार (पोलिस उप आयुक्त, गुन्हे शाखा) धीरज पाटील (पोलिस उप आयुक्त, विशेष शाखा), विक्रांत देशमुख (पोलिस उप आयुक्त, वाहतूक शाखा), आळंदी येथील भेटी दरम्यान आळंदी नगरपरिषदेतर्फे माधव खांडेकर (मुख्याधिकारी, आळंदी नगर परिषद) व प्रशांत कुऱ्हाडे (नगराध्यक्ष, आळंदी नगरपरिषद) उपस्थित होते.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories