‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे नेला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे नेला जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, ता. ४ जुलै २०२६ - पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज लक्षात घेवून राबविण्यात येणारा ‘पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प’हा शेतकऱ्यांच्या संमतीने, विश्वासाने आणि संवादातूनच पुढे नेला जाईल. शेतकऱ्यांच्या भावना आणि मतांचा पूर्ण आदर राखून याबाबत निर्णय घेतले जातील. स्थानिक शेतकरी, स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी, संबंधित शासनाचे विभाग यांची व्यापक चर्चा, परस्पर संवाद आणि विश्वासाच्या माध्यमातूनच या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढून हा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये शुक्रवारी (ता. ३) पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनीधी व सबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
राज्यात दिवसेंदिवस नवीन वसाहती वाढत आहेत. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेवून त्यानुसार पाण्याचे नियोजन आणि कार्यक्षम वापर झाला नाही, तर भविष्यात गंभीर जलसंकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य वापर आणि दीर्घकालीन नियोजन करणे ही काळाची गरज आहे. पिंपरी-चिंचवड शहराची भविष्यातील गरज लक्षात घेवून पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प हा शहरासाठी खूप महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी सरकार तयार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा. शासनाकडून शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करावीत यामध्ये दिरंगाई करू नये, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
